पुण्याचे डॉ. वर्धमान कांकरिया यांची जगातील टॉप ५० नेत्रतज्ज्ञांमध्ये निवड
पुणे : पुणे शहरासाठी तसेच भारतीय नेत्ररोगतज्ज्ञ क्षेत्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे, ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया यांची अमेरिकेतील प्रतिष्ठित एक्सपर्टस्केप यूएसए या जागतिक संस्थेकडून जगातील सर्वोत्तम ५० नेत्रतज्ज्ञांमध्ये निवड करण्यात आली आहे.
एक्सपर्टस्केप ही संस्था वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, वैज्ञानिक प्रकाशने, शैक्षणिक प्रभाव आणि जागतिक वैद्यकीय प्रगतीतील योगदान यांच्या आधारे जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांची क्रमवारी निश्चित करणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त संस्था आहे.
पुण्यातील एशियन आय हॉस्पिटलचे संचालक डॉ. वर्धमान कांकरिया यांना २०१० पासून मोतीबिंदू आणि नंबर कमी करण्याच्या शस्त्रक्रिया (Refractive Surgery) क्षेत्रातील उल्लेखनीय आंतरराष्ट्रीय योगदानासाठी हा सन्मान मिळाला आहे. लॅसिक (LASIK), रोबोटिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक दृष्टी सुधारणा शस्त्रक्रियांमध्ये ते भारतातील अग्रगण्य नेत्रतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. या प्रतिष्ठित यादीमध्ये एआयआयएमएस (AIIMS) दिल्लीच्या प्रा. डॉ. नम्रता शर्मा तसेच बंगळुरूचे डॉ. रोहित शेट्टी यांचाही समावेश आहे.
डॉ. कं|करिया यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मानाचे पुरस्कार आणि गौरव प्राप्त केले आहेत. भारतात सर्वाधिक लॅसिक (LASIK) शस्त्रक्रिया करणाऱ्या नेत्रतज्ज्ञांपैकी एक म्हणून त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद आहे. तसेच मायनस ३० नंबरसारख्या अत्यंत जास्त चष्मा नंबरवर अत्याधुनिक शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी उपचार केल्याबद्दलही त्यांना विशेष ओळख मिळाली आहे. भारतामध्ये रोबोटिक अचूकतेच्या फेम्टोसेकंद लेझर-सहाय्यित मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Femtosecond Laser Assisted Cataract Surgery) या तंत्रज्ञानाचे ते अग्रणी तज्ज्ञ मानले जातात. जागतिक दर्जाचे अनेक आधुनिक नेत्रतंत्रज्ञान पुणे आणि भारतात उपलब्ध करून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. कांकरिया यांनी सांगितले की, “हा सन्मान केवळ माझा नसून एशियन आय हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचा, माझ्या गुरूंचा, रुग्णांचा आणि पुणे शहराचा आहे. हा गौरव भविष्यात अधिक उत्कृष्ट नेत्रसेवा, संशोधन, नवकल्पना आणि जागतिक दर्जाची शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल.”
या यशामुळे पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, प्रगत आरोग्यसेवा आणि नेत्रचिकित्सा उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून शहराची वाढती प्रतिष्ठा अधिक बळकट झाली आहे.
