डीपी वर्ल्ड इंडिया गोल्फ चॅम्पियनशीप दिल्ली गोल्फ क्लब येथे १५ ऑक्टोबर पासून रंगणार
जगातील अव्वल आंतरराष्ट्रीय गोल्फ पटुंचा सहभाग निश्चित
पुणे, ९ ऑक्टोबर २०२६: दिल्ली गोल्फ क्लब यांनी सुमारे सहा दशकापूर्वी, १९६५ मध्ये पहिल्या इंडियन ओपन गोल्फ स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केल्यापासून हा क्लब भारतीय गोल्फ क्लबचे माहेर घर म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळे येत्या १५ ऑक्टोबर पासून रंगणाऱ्या ४० लाख डॉलर पारितोषिक रकमेच्या डीपी वर्ल्ड इंडिया गोल्फ चॅम्पियनशीप साठी यजमान पदाचा मान दिल्ली गोल्फ क्लबला देण्यात आला यात आश्चर्य नव्हतेच.
या ऐतिहासिक क्लब मध्ये १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान पार पडणाऱ्या डीपी वर्ल्ड इंडिया गोल्फ चॅम्पियनशीप स्पर्धेत जगभरातील अनेक स्टार गोल्फपटूंनी आपला सहभाग निश्चित केला असून डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो या संकेत स्थळावर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची तिकीट विक्री सुरु झाली आहे.
जगातील सर्वोत्तम खेळाडू रोरी मॅकएलरॉय आणि गतविजेत्या टॉमी फ्लीटवूडसह जगातील विविध स्पर्धांमधील विजेते खेळाडू विक्रमी पारितोषिक रकमेसाठी आपले कौशल्य पणाला लावणार असून त्यामुळे स्पर्धेच्या आकर्षणात भर पडली आहे. आता पर्यंत भारतात आणि आशियात झालेल्या गोल्फ स्पर्धांमध्ये एकत्र आलेला सर्वोत्कृष्ट तारांकित खेळाडूंचा संच या स्पर्धेत पाहावयास मिळणार असून २०२५च्या स्पर्धेत खेळलेल्या अनेक खेळाडूंसोबत जगभरातील विविध मेजर स्पर्धांचे विजेते एरॉन राय, रयान फॉक्स, स्पॅट्रिक रीड आणि जस्टिन रोझ यांच्या सहभागामुळे या स्पर्धेला आगळी प्रतिष्ठा लाभली आहे.
या स्पर्धेच्या मानांकन यादीत रोरी मॅकएलरॉय व स्पॅट्रिक रीड या माजी मास्टर्स विजेत्यांसह विद्यमान ओपन विजेता रयान फॉक्स, तसेच पीजीए चॅम्पियनशिप विजेता एरॉन राय आणि माजी यूएस ओपन विजेता व ऑलिम्पिक विजेता जस्टिन रोझ यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे.
गोल्फच्या इतिहासांतील सर्व मेजर स्पर्धा जिंकून करिअर स्लॅम पटकावणारा जगभरातील इतिहासातील केवळ सहावा खेळाडू रोरी मॅकएलरॉय याला अग्रमानांकन देण्यात आले असून त्या पाठोपाठ गतविजेता फ्लीटवूड, माजी ओपन विजेता स्टेन लॉरी, माजी फेडेक्स कप विजेता व्हिक्टर हॉगलँड तसेच, युरोपियन रायडर कप कर्णधार आणि माजी अव्वल मानांकित ल्युक डोनाल्ड यांनी मानांकन यादीत स्थान मिळवले आहे.
अशा बलाढ्य खेळाडूंच्या उपस्थिती मुळे दिल्ली गोल्फ क्लब येथे येणाऱ्या ज्युनियर खेळाडूं बरोबरच या स्पर्धेसाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व खेळाडूंवर प्रचंड प्रभाव पडणार आहे. सध्याच्या काळातील विविध गोल्फ कोर्सवर पाहावयास मिळणाऱ्या रुंद व विस्तृत फेअरवेजच्या पार्श्वभूमीवर घनदाट झाडी आणि गवत असलेला दिल्ली गोल्फ क्लबचा फेअरवे एक खडतर आव्हान ठरणार आहे. विविध स्तरांवरील गोल्फ पटूमध्ये दिल्ली गोल्फ क्लबचा फेअरवे विनोदाने जंगल म्हणून ओळखला जातो. तब्बल २२० एकरांमध्ये पसरलेल्या हिरव्यागार गोल्फ कोर्सला भारतीय गोल्फ चे चालतेबोलते संग्रालय म्हणूनच ओळखले जाते. अतिशय अरुंद वळणावळणाच्या आव्हानात्मक ग्रीन आणि रफ फेअरवेजचा समावेश असलेल्या या गोल्फ कोर्सवर जगातील नामांकित खेळाडूंना आपल्या कौशल्य दाखवण्याचे आव्हान स्वीकारावे लागले आहे. तसेच सुमारे शतक भरापासून आधुनिक काळापर्यंत या गोल्फ कोर्सवर शेकडो गोल्फपटूंनी आपले कौशल्य आजमावले आहे.
दिल्ली गोल्फ क्लबची स्थापना १९२८ मध्ये झाली होती तेव्हापासून हिरवीगार झाडी, दाट गवत या बरोबरच अनेक ऐतिहासिक वास्तू आणि आकर्षक वास्तुकलेचा समावेश असलेल्या स्मृतिस्थळांचा या गोल्फ कोर्सवर वारसा पाहावयास मिळतो. १९५० मध्ये कॉर्पोरेट स्पर्धा आयोजित केल्यानंतर या क्लबवर १९६४ मध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली. त्यानंतर १९७०च्या दशकात पाच वेळा ओपन स्पर्धा जिंकणारा महान ऑस्ट्रलियन गोल्फपटू पीटर थॉमसन याने दिल्ली गोल्फ कोर्सवर तीन स्पर्धा जिंकण्याबरोबरच या संपूर्ण कोर्सचा कायापालट करण्याची कामगिरी बजावली. त्यानंतर २०१९ मध्ये गॅरी प्लेअर स्टुडिओ यांनी या कोर्सचे संपूर्ण नूतनीकरण करताना नव्या आव्हानात्मक बंकर्सचा आणि बहुस्तरीय ग्रीन्सचा समावेश केल्यामुळे हा कोर्स जागतिक दर्जाचा बनला.
आता या स्पर्धेसही नव्या ड्रायव्हिंग रेंज सह बीकोर्सवरील आठव्या होल चा नव्याने कायापालट करण्यात येत असून गोल्फ कोर्सवर नव्या कॅफेचे उदघाटन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या तिकीट विक्री ला झपाटयाने मोठा प्रतिसाद लाभत असून प्रॅक्टिस एरियावर सुरु असलेल्या सरावासाठीहि गोल्फ पटूंची मोठी उपस्थिती लाभत आहे. याबरोबरच दिल्ली गोल्फ क्लबने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, सुसज्ज फिटनेस सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपहारगृह आणि जगात सर्वोत्तम दर्जाच्या गोल्फ साहित्यांची विक्री करणारे विशेष केंद्र यांची उभारी केल्यामुळे दिल्ली गोल्फ क्लबला आगळा साज मिळाला आहे. भारतातील दिवाळीचा दिपोस्तवही नजीक आल्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने येथे सर्व खेळाडू व गोल्फ शौकिनांसाठी हि स्पर्धा आनंदायी व संस्मरणीय ठरेल याची काळजी दिल्ली घेत आहे.
