भास्कर जाधवांना भाजप आमदार प्रमोद जठारांची खुली ऑफर; ‘कोकणाला तुमची गरज, आम्हाला तुम्ही हवे’
रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांना भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी थेट सत्तेत येण्याची खुली ऑफर दिल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
चिपळूण येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमोद जठार आणि भास्कर जाधव एकाच मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना जठार यांनी जाधव यांचे कौतुक करताना, “कोकणाला तुमची गरज आहे, आम्हाला तुमची गरज आहे,” असे विधान केले.
भास्कर जाधव हे ज्येष्ठ आणि अनुभवी आमदार असून राज्याच्या राजकारणात त्यांचे स्वतंत्र स्थान आहे. मात्र, ठाकरे गटाकडून त्यांच्या अनुभवाचा योग्य वापर केला जात नसल्याचा दावा जठार यांनी केला. विरोधी पक्षनेतेपदासाठी पात्र असूनही त्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.
“भास्कर जाधव यांची सत्तेत गरज आहे. आज आम्ही दोघांनी चिपळूणमध्ये एक झाड लावले आहे. हे झाड भविष्यात चांगली फळे देईल,” असे सूचक वक्तव्य जठार यांनी केले.
ठाकरे गटातील सहा खासदारांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील आमदारही पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असलेल्या भास्कर जाधव यांचे नावही या चर्चेत घेतले जात आहे. त्यामुळे भाजप आमदार प्रमोद जठार यांनी दिलेल्या या खुल्या ऑफरमुळे राजकीय चर्चांना आणखी रंग चढला आहे.
