Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

‘एटीएस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का?’ असदुद्दीन ओवेसी यांचा राज्य सरकारला सवाल

 

मुंबई: प्रतिनिधी

बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली आरोपींच्या आयुष्यातील महत्वाची वर्ष कारागृहात वाया घालविणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा सवाल ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राज्य सरकारला केला आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात लोकल रेल्वेमध्ये सन 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायालयाने यापूर्वी यापैकी सात आरोपींना जन्मठेप तर पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती.

आरोपींच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे उभे करण्यात तपास यंत्रणांना यश आलेले नाही. अटकेनंतर तब्बल 100 दिवसांनी दिलेला कबुली जबाब दबाव तंत्राचा वापर करून घेतलेला असू शकतो. जप्त केलेली स्फोटके, बंदूक आणि नकाशे यांचे खटल्याच्या दृष्टीने फार महत्त्व नाही. बॉम्बस्फोट नेमके कोणत्या स्फोटकांच्या द्वारे करण्यात आले, हे सरकारी वकिलांना स्पष्ट करण्यात यश आलेले नाही, अशी टिप्पणी करून उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

या संपूर्ण खटल्याच्या 19 वर्षाच्या कालावधीत हे सर्व आरोपी राज्यातील विविध कारागृहात राहिले आहेत. त्यापैकी एकाचा नागपूर कारागृहात कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. इतर आरोपी या संपूर्ण कालावधीत एक दिवस देखील कारागृहाबाहेर आलेले नाहीत.

हाच संदर्भ घेऊन ओवेसी यांनी राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर टीका केली आहे. या सर्व आरोपींनी आपली उमेदीची वर्ष कारागृहात घालवली आहेत, याकडे ओवेसी यांनी लक्ष वेधले.

ज्या प्रकरणांमध्ये जनतेचा आक्रोश होऊ शकतो, अशा प्रकरणांमध्ये आधी गुन्हेगार कोण हे निश्चित करायचे आणि त्या दृष्टीने तपास पुढे न्यायचा. पत्रकार परिषदा घेऊन तपासाबाबत जनतेला माहिती द्यायची, अशीच पोलिसांची भूमिका असते. दहशतवादांच्या प्रकरणात बहुतेक वेळा अशीच दिशाभूल झाल्याचे दिसून येते, अशी टीकाही ओवेसी यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading