दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत FDAचा कडक इशारा; सेलिब्रिटी आणि ब्रँड अॅम्बेसेडरही रडारवर
मुंबई प्रतिनिधी :
ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आता कडक भूमिका घेतली आहे. अशा जाहिरातींमधून खोटे दावे करून उत्पादने विकणाऱ्या उत्पादकांसह त्यांची जाहिरात करणारे सेलिब्रिटी, ब्रँड अॅम्बेसेडर, जाहिरातदार आणि विपणन संस्थांवरही कठोर कारवाई करण्याचा इशारा FDAने दिला आहे.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या किंवा फसव्या दाव्यांच्या माध्यमातून उत्पादनांची विक्री करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला माफी दिली जाणार नाही. उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्यांवर प्रथम कारवाई केली जाईल, मात्र त्या उत्पादनांचा प्रचार करणाऱ्या सेलिब्रिटींनाही जबाबदार धरले जाईल.
मुंढे यांनी सांगितले की, राज्यभरात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, बेकायदेशीर औषधनिर्मिती आणि अनधिकृत विक्री याविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या प्रकारांवर सातत्याने लक्ष ठेवून कारवाई केली जाईल.
दरम्यान, FDAने नुकत्याच राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. 29 मे ते 31 मे या कालावधीत महाराष्ट्रातील विविध भागांत छापेमारी करून सुमारे 97.2 लाख रुपयांचा भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण 84,335 किलो अन्नपदार्थ आणि कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये बूंदी लाडू, खवा, कँडी, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, फ्रोजन डेझर्ट, मसाले, शेंगदाणा चिक्की तसेच अन्नभेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या काही संशयित पदार्थांचा समावेश आहे. या सर्व नमुन्यांची तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे FDAने स्पष्ट केले.
ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि उत्पादनांच्या जाहिरातींपासून ते विक्रीपर्यंत संपूर्ण साखळीमध्ये पारदर्शकता व जबाबदारी निश्चित करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे FDAने पुन्हा अधोरेखित केले आहे. या निर्णयामुळे खोट्या दाव्यांच्या जाहिरातींना आळा बसण्याची आणि ग्राहकांचा विश्वास अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
