Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यातील गुन्हेगारीवरून सुप्रिया सुळेंना पोलीस आयुक्तांचे प्रत्युत्तर; आकडेवारीसह मांडली वस्तुस्थिती


पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेल्या चिंतेला उत्तर देताना पुणे पोलीस आयुक्तांनी सविस्तर पत्र पाठवून शहरातील कायदा व सुव्यवस्थेची वस्तुस्थिती आकडेवारीच्या आधारे स्पष्ट केली आहे. गेल्या काही वर्षांत पुण्यातील बहुतांश प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये आणि २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच २०२६ या वर्षातही बहुतांश गुन्ह्यांमध्ये घट दिसून येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यांमध्ये सुमारे २७ टक्के घट झाली आहे. मारहाण व दुखापतीच्या घटनांमध्ये सुमारे ३ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. साखळी चोरीच्या घटनांमध्ये ५६ टक्के, तर जबरी चोरीच्या घटनांमध्ये ३६ टक्के घट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये १४ टक्के आणि सामान्य चोरीच्या घटनांमध्ये २४ टक्के घट झाली असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीचा एकूण कल कमी होत असल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे.
दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यांमध्ये सहा घटनांची किरकोळ वाढ झाली असली तरी त्यापैकी अनेक घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पती-पत्नी किंवा इतर कुटुंबीयांमधील वादातून या घटना घडल्याने त्यांचा थेट संघटित गुन्हेगारीशी संबंध नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रभावीपणे काम करत असून, गुन्हेगारी नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचे पोलीस आयुक्तांनी आपल्या पत्रातून स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading