इफकोचे अध्यक्ष दिलीप संघाणी यांच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिका कृषी सहकार्याला नवी गती
नवी दिल्ली, : वॉशिंग्टन डी.सी. येथील यू.एस.-इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) ने इफकोचे अध्यक्ष श्री. दिलीप संघाणी यांच्या नेतृत्वाखालील पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PHDCCI) च्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. या बैठकीचे महत्त्व लक्षात घेऊन USIBC ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर या संवादाला भारत-अमेरिका कृषी सहकार्य दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून अधोरेखित केले.
USIBC ने आपल्या संदेशात म्हटले आहे की, श्री. दिलीप संघाणी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेमुळे कृषी क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा मिळाली असून, दोन्ही देशांसमोरील समान आव्हानांवर उपाय शोधणे आणि नव्या संधींचा शोध घेणे शक्य होईल. नवोन्मेषाधारित कृषी धोरणे, शाश्वत कृषी विकास, अन्नसुरक्षा आणि शेतकऱ्यांची समृद्धी या क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात अधिक मजबूत भागीदारीची गरज असल्याचेही परिषदेकडून अधोरेखित करण्यात आले.
अमेरिकेतील आघाडीच्या उद्योग आणि व्यापार संघटनांपैकी एक असलेल्या USIBC ने या बैठकीला सार्वजनिकरीत्या दिलेले महत्त्व विशेष उल्लेखनीय आहे. ही बाब भारतातील सहकार चळवळीला मिळत असलेली जागतिक मान्यता, इफकोची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा आणि भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे जागतिक स्तरावर प्रभावी प्रतिनिधित्व करणारे श्री. दिलीप संघाणी यांचे नेतृत्व यांचे द्योतक आहे.
या बैठकीत कृषी उत्पादनक्षमता वाढविणे, अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, जमिनीचे आरोग्य सुधारणा, शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देणे, नवोन्मेषाधारित कृषी उपाययोजना विकसित करणे तसेच अन्न व पोषण सुरक्षा मजबूत करणे या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही देशांतील कृषी तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि उद्योग प्रतिनिधींनी भारत-अमेरिका सहकार्याचा विस्तार झाल्यास कृषी क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ मिळतील, यावर एकमत व्यक्त केले.
श्री. दिलीप संघाणी यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा संवाद भारत-अमेरिका कृषी भागीदारी अधिक सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. तसेच जागतिक स्तरावर सहकार-आधारित कृषी विकासाला चालना देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न, उत्पादकता आणि कृषी सुरक्षा बळकट करणे या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
