Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

विदुषी जया जोग यांना मानवंदना देण्यासाठी ‘नक्षी स्वर लयीची…’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : ज्येष्ठ सतारवादक, लेखिका, कवयित्री, गुरु विदुषी जया जोग येत्या २० जुलै रोजी अमृत-महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून या निमित्ताने त्यांच्या संगीतयात्रेचा गौरव करण्याच्या उद्देशाने त्यांच्या शिष्यांनी येत्या रविवार दि. २० जुलै रोजी ‘नक्षी स्वर लयीची…’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नवी पेठ येथील एस एम जोशी सभागृह या ठिकाणी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत सदर कार्यक्रम संपन्न होणार असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. कार्यक्रमादरम्यान काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.

यावेळी सुप्रसिद्ध बासरीवादक गुरु पं. केशव गिंडे यांच्या हस्ते विदुषी जया जोग यांचा सत्कार करण्यात येईल. तर प्रसिद्ध व्हायोलिन वादक, रचनाकार असलेल्या डॉ. नीलिमा राडकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यानंतर जया जोग यांच्या शिष्यांचे समूह सतारवादन संपन्न होईल. यावेळी प्रज्ञा मेने, मानसी दांडेकर, स्वाती घैसास, सुचेता गोसावी, बीमा लिमकर, रिशान कुळकर्णी हे शिष्य जयाताई यांच्या स्वतंत्र रचनांचे सादरीकरण उपस्थितांसमोर करतील.

यानंतर प्रज्ञा मेने आणि दीपा कुडतरकर यांचे सतार- व्हायोलिन सहवादन रंगेल. सर्व कार्यक्रमांना भावना टिकले व अभिजित बारटक्के हे तबलासाथ करतील. कार्यक्रमाचा समारोप विदुषी जया जोग यांच्या एकल सतारवादनाने होईल. रंजना काळे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading