विठ्ठलमूर्ती सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देते – डॉ. गो. बं. देगलूरकर
पुणे – “मूर्तिशास्त्राने सर्वसामान्यांचे चर्मचक्षू आणि भावचक्षू, यांचा सूक्ष्म विचार केला आहे. श्रीविठ्ठलाची मूर्ती याच विचारांची परिणती आहे. विठ्ठलमूर्ती ही सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देणारी आहे”, असे प्रतिपादन ज्येष्ठ मूर्तिशास्त्रतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी येथे केले. तत्कालीन सामाजिक परिस्थितीची गरज म्हणून सर्व समाजघटक एकत्र यावेत, त्यांनी एकाच देवतेची उपासना करावी, या संतविचारांची पार्श्वभूमी यामागे आहे, असेही ते म्हणाले.
इंडी हेरीटेज तर्फे सुरु करण्यात आलेल्या मास्टर क्लास उपक्रमाचा शुभारंभ डॉ. देगलूरकर यांच्या विठ्ठल मूर्ती’ या विषयावरील व्याख्यानाच्या माध्यमातून झाला. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या फिरोदिया सभागृहात झालेल्या या मास्टर क्लासला श्रोत्यांचा उस्त्फुर्त प्रतिसाद लाभला.
मूर्तिशास्त्राचा उल्लेख पाणिनी, कौटिल्य या सारख्या धुरिणांनी केला आहे. सुरवातीला पाषाणखंड रूपात आढळणाऱ्या मूर्ती कालांतराने मनुष्यरूपात घडविल्या जाऊ लागल्या. देवतेचे श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी मूर्तीला अधिक हात, मस्तके, अलंकार अशी सजावट सुरू झाली’, असे सांगून डॉ. देगलूरकर यांनी मूर्तिशास्त्राचा प्रारंभ, विकासाचे टप्पे याविषयीचे विवेचन केले.
इसवीसनाच्या १२ व्या शतकापर्यंत मूर्तिकला परिणत अवस्थेत पोहोचली होती. उपासकांच्या कल्पनेनुसार मूर्तींची घडण केली जाऊ लागली. मूर्तीच्या माध्यमातून तत्त्वविचार, अध्यात्म हेही सांगितले जाऊ लागले. उपासकांमध्ये मतभेद होऊ लागल्यावर आणि परकीय आक्रमणांचे संकट ओढवल्यावर समाजघटकांचे विखुरलेपण संपवून, समाज एकत्र यावा, सामाजिक अभिसरण घडावे, अशा उदात्त हेतूने संतपरंपरेने विठ्ठल या देवतेच्या माध्यमातून महत्त्वाचे सामाजिक योगदान दिले, असे डॉ. देगलूरकर म्हणाले.
विठ्ठल म्हणजेच विष्णू असून विठ्ठलमूर्ती ही योगस्थानक मूर्ती आहे’, असे सांगून देगलूरकर म्हणाले, विठ्ठलमूर्तीला दोनच हात आहेत कारण योगमूर्ती असल्याने चक्र, गदेसारखी शस्त्रे अप्रस्तुत ठरतात. माढा येथील मूर्ती ही मूळ मूर्ती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विवेचनाच्या ओघात देगलूरकर यांनी शारंगधर विष्णू, उपेंद्र, वीस हातांचा विष्णू (विश्वरूप), धन्वंतरी विष्णू, वैकुंठ विष्णू आणि वासुदेव विष्णू, अशा मूर्तींच्या स्लाईड्सच्या माध्यमातून विठ्ठल म्हणजेच विष्णू, हे देखील स्पष्ट केले.
प्रास्ताविक करताना इंडी हेरीटेजचे तुषार जोशी म्हणाले, “भारतीय विद्या (इंडॉलॉजी) चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, या क्षेत्रात काही योगदान देण्याची इच्छा झाली. त्यातून ‘इंडी हेरीटेज’ची सुरवात होत आहे. मास्टर क्लास आणि डायलॉग अशा दोन उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय विद्या या क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ञांचे व संशोधकांचे विचार व काम जनमानसापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाईल. येत्या काळात डॉ. देगलूरकर यांचे गणेश मूर्ती या विषयवारील व्याख्यान मास्टर क्लास उपक्रमांतर्गत तर काही संशोधकांचे व्याख्यान डायलॉग उपक्रमांतर्गत आयोजित करण्याची योजना आहे.”
अनुश्री घिसाड यांनी डॉ. देगलूरकर यांचा परिचय करून दिला, आभार मानले तसेच सूत्रसंचालन केले.
