मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप
महामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी अपक्ष संघ सरसावला
पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत समोरासमोर दिसणारी दोन प्रमुख पॅनल प्रत्यक्षात एकाच विचारधारेची असून त्यांच्यातील संघर्ष हा केवळ दिखावा असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांत महामंडळाच्या कारभारात असलेल्या संचालकांनी चित्रपटसृष्टीच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याऐवजी अंतर्गत वाद आणि राजकारणातच वेळ घालवल्याचा आरोप त्यांनी केला. प्रस्थापितांची मुजोरी मोडीत काढून महामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी आठ अपक्ष उमेदवारांनी एकत्र येऊन संघ उभा केल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक अमोल भावे, निर्माता महादेव शिरोळकर, मानसिंग कदम, कला दिग्दर्शक उल्हास लांडगे या उमेदवारांसह अपक्ष संघाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्री, निर्मात्या भाग्यश्री देसाई या उपस्थित होत्या. अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि शाहीर संभाजी भगत यांच्यासह अनेकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा अपक्ष संघाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना लोणकर म्हणाले की, दोन्ही पॅनलमधील अनेक माजी संचालक वेगवेगळ्या गटांतून निवडणूक लढवत असले तरी त्यांच्यातील परस्पर समन्वय स्पष्ट दिसून येतो. काही उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी दोन्ही गटांनी एकमेकांना मदत केल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला “मिलीभगत” असे संबोधले.
महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नसल्याचा दावा देखील त्यांनी फेटाळून लावला. काही उमेदवार आणि राजकीय नेत्यांमधील संबंध सर्वश्रुत असल्याचे सांगत, निवडणूक प्रक्रियेवर राजकीय प्रभाव अद्याप कायम असल्याचे त्यांनी म्हटले.
वितरण आणि प्रसिद्धी विभागातून निवडणूक लढवत असलेल्या लोणकर यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवरही टीका केली. चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धी आणि वितरण व्यवसायाच्या नावाखाली आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करत, आपण गेली चार दशके विनामूल्य प्रसिद्धीचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
महामंडळात नव्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज व्यक्त करताना लोणकर म्हणाले की, विद्यमान गटांच्या राजकारणाला कंटाळलेल्या सभासदांनी यावेळी बदलाचा निर्णय घ्यावा. पुणे, मुंबई आणि राज्यातील सर्व सुज्ञ मतदारांनी मतदानासाठी पुढे आल्यास चांगल्या आणि प्रामाणिक व्यक्तींना संधी मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दशकातील कारभारावर टीका करताना दिग्दर्शक भावे यांनी सभासद, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गरीब कलाकारांच्या निवासासाठी आणि वृद्धाश्रमासाठी दिलेल्या जागेवर अद्याप कोणतेही ठोस काम झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महामंडळाच्या निधीचा वापर कार्यालयांसाठी करण्यात आला, मात्र कलाकारांच्या कल्याणासाठी अपेक्षित उपक्रम राबवले गेले नाहीत, असा दावा त्यांनी केला.
महामंडळाच्या घटनेतील बदल, मालमत्ता निर्मिती आणि आर्थिक निर्णयांविषयी सभासदांना पुरेशी माहिती देण्यात आली नसल्याचाही आरोप महादेव शिरोळकर यांनी केला. पुणे महापालिकेकडून अत्यल्प भाडेतत्त्वावर उपलब्ध होऊ शकणारी कार्यालयाची जागा नाकारून नंतर स्वतंत्र कार्यालयांवर खर्च करण्यात आल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
महामंडळात गुंडा-कुंडांचा मुजोर कारभार–अभिनेत्री भाग्यश्री देसाई –मतदार यादीच्या मुद्द्यावर बोलताना भाग्यश्री देसाई मतदार यादी करताना जाणूनबुजून आपल्याला मते मिळणार नाहीत असा संशय असलेल्यांची नावे वगळून मतदार यादी करण्यात आली ,मी स्वतः कित्येक वर्षे मतदार होते आणि आता माझे मत मिळणार नाही हे लक्षात आल्यावर माझे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले . मृत व्यक्तींची माहिती असून त्यांची नावे मतदार यादीत ठेवण्यात आली त्यामुळे त्यांच्या नावावर बोगस मतदान होण्याची दाट शक्यता आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे . चांगली लोकं महामंडळावर यावीत म्हणून मी या अपक्ष उमेदवारांना पाठींबा देत आहे. भाग्यश्री देसाई यांनी सुमारे ४० हजार संभाव्य मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप केला. चित्रपटसृष्टीशी काडीचा संबंध नसलेल्या लोकांची नावे मतदार यादीत घुसवली आहेत. हा सर्व गुंडा-कुंडांचा मुजोर कारभार असल्याची टीका अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांनी केली.आज पुण्यात मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत एकतरी उभ्या राहिलेल्या अपक्षांच्या संघाला पाठींबा देताना त्या बोलत होत्या*
