Tuesday, September 22, 2026
Latest NewsPUNE

तरुण पिढीने दासबोध ग्रंथाचे अनुकरण करावे – कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये

पुणे  : मनाचे श्लोक हे केवळ लहान मुलांसाठी नाहीत आणि दासबोध, ज्ञानेश्वरी  हे ग्रंथ वामप्रस्थाश्रमासाठी नाहीत हे लक्षात घेत आज जास्तीत जास्त तरुणांनी ग्रंथराज दासबोध हा समर्थ रामदास यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे अनुकरण केले पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांनी व्यक्त केले. हिंदू महिला सभेच्या नवरात्रोत्सवाच्या अमृत महोत्सवी पदार्पणानिमित्त सदाशिव पेठेतील भरतनाट्य मंदिर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले यावेळी उपस्थित होत्या.

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली हिंदू महिला सभा ही यावर्षी ९० व्या वर्षांत तर संस्थेने सुरु केलेला नवरात्र महोत्सव आपल्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. याचे औचित्य हिंदू महिला सभेने येत्या वर्षभरात अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्यांची सुरुवात समर्थ भक्त समीर लिमये यांच्या कॉर्पोरेट कीर्तनाने झाली.

स्वा. सावरकर व रामदास स्वामी यांच्यामध्ये स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम, लढाऊ वृत्ती, निष्काम कर्मयोग यांसारखी अनेक साम्यस्थळ आहेत असे सांगत लिमये म्हणाले की, “आजच्या काळात समर्थ रामदास स्वामी यांचे विचार किती तंतोतंत लागू पडतात हे खास करून तरुण पिढीला त्यांच्याच भाषेत अत्यंत सोप्या शब्दात कळावे यासाठी या कॉर्पोरेट कीर्तनाचे आयोजन आम्ही करीत असतो. ४०० वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मनाचे श्लोक, दासबोध, करुणाष्टके यांची महती सर्वसामान्यांपासून तरुण वर्गापर्यंत पोचली पाहिजे हा यामागे आमचा हेतू आहे.”

या कॉर्पोरेट कीर्तनामध्ये आम्ही विशेषकरून पॉवरपॉइंटचा उपयोग करीत असून यामुळे दासबोधातील ‘रीडिंग बीटविन दी लाईन्स’ चा अर्थ समजण्यास मदत होते. याबरोबरच नामाचा गरज, समर्थांच्या रचनांना स्वत: लावलेल्या चाली यामुळे तरुण पिढीला त्यांच्या भाषेत विषय समजावण्याचा आमचा प्रयत्न असतो असेही समीर लिमये यांनी सांगितले.

कॉर्पोरेट कीर्तन करणारे समीर लिमये हे पेशाने मेकॅनिकल इंजिनियर होते, मात्र गेली काही वर्षे ते समर्थ रामदास स्वामी यांचे विचार जगभर पोहोचावे या उद्देशाने कॉर्पोरेट कीर्तन करीत आहेत. भरतनाट्य मंदिर येथील कार्यक्रमादरम्यान धनश्री नानिवडेकर यांनी कार्यक्रमाचे पॉवरपॉइंट सादरीकरण व निर्मितीचा भाग सांभाळला.वंदना जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालक केले.

यासोबतच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात आले असून यामध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावरील ‘अजि सोनियाचा दिनु’, ‘एक टाळी आणि बरच काही’ हा तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम, जागतिक महिला दिनानिमित्त स्वातंत्र्यपूर्वकाळात रोप मल्लखांब आणि वेताचा मल्लखांब करणाऱ्या ९ भगिनींच्या मुलाखतीचा कार्यक्रम आणि सुप्रसिद्ध गायिका वृषाली मावळणकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading