Tuesday, September 22, 2026
Latest NewsPUNE

साम्राज्यवादी पुरातत्वज्ञांना काशिनाथ दीक्षित यांनी दिले होते चोख प्रत्युत्तर – डॉ. गो. बं. देगलूरकर

पुणे  : भारतात पुरातत्वशास्त्रात चांगले काम व्हावे, या उद्देशाने विविध ठिकाणी यशस्वी उत्खनने केलेले पाश्चात्य पुरातत्त्वज्ञ लिओनार्ड वूली यांना भारतात सरकारने पाचारण केले. तेव्हा भारतीय पुरातत्त्वशास्त्र हे बाल्यावस्थेत आहे अशी कठोर व निष्ठुर टीका वूली यांनी केली होती. ब्रिटीश अधिकाऱ्याच्या या टीकेला राव बहादूर काशिनाथ नारायण दीक्षित यांनी शास्त्रीय पद्धतीने स्तरश: केलेल्या आपल्या उत्खननामधून पहिल्यांदा छेद दिला असे प्रतिपादन डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती, ज्येष्ठ पुरातत्व संशोधक व मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केले.

विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या रावबहादूर काशिनाथ नारायण स्मृती व्याख्यानात डॉ. देगलूरकर बोलत होते. दीक्षित यांचे कुटुंबीय व भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. वसंत शिंदे, भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आशुतोष जोशी व निबंधक श्रीनंद बापट यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान डॉ. वसंत शिंदे यांचे ‘इव्होल्युशन ऑफ दि हरप्पन सिव्हिलायजेशन फ्रॉम अर्ली डिस्कव्हरीज् टू रिसेंट एव्हिडन्सेस’ या विषयावरील व्याख्यान झाले.

या आधी बोलताना डॉ. देगलूरकर म्हणाले, “जॉन मार्शल हे २० हून अधिक वर्षे भारतीय पुरातत्त्व खात्याचे प्रमुख होते. त्यांनी अनेक उत्खनने केली, या क्षेत्रात त्यांचे नाव मोठे आहे. मात्र त्यांनी शास्त्रीय उत्खनन कसे करायला हवे, पुरातत्वशास्त्राची आवड कशी निर्माण करायला हवी यांवर कधी काम केले नाही. शास्त्रीय पद्धतीने स्तरश: उत्खनन कसे असावे हे पहिल्यांदा आपल्याला रावबहादूर काशिनाथ दीक्षित यांनी दाखवून दिले. दीक्षित हे १९३७ ते १९४४ सालादरम्यान भारतीय पुरातत्त्व खात्याचे महासंचालक होते. आपण भारतीय मार्शल, मॉर्टीमर व्हीलर यांचे गुणगान गातो परंतु दीक्षित यांना त्यांच्या कामाचे श्रेय आम्ही कधी दिले नाही याचे वाईट वाटते. यांचे काम आपल्याला कळलेच नाही असे म्हणावे लागेल.”

दीक्षित यांनी जसे मोहेंजोदडो, हडप्पा, तक्षशीला येथे मोठ्या प्रमाणात उत्खनने केली तशीच सांची, लखनऊ येथेही महत्त्वाची उत्खनने केली. त्यांनी उत्तर प्रदेशातील अहिच्छत्र येथे केलेले उत्खनन मला व्यक्तीश: अधिक भावते असे सांगत डॉ. देगलूरकर म्हणाले, “पुराततवशास्त्र क्षेत्रात दीक्षित यांचे योगदान मोठे असल्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी. अहिच्छत्रला १५०० वर्षांचा इतिहास आहे, तक्षशिला या स्थळाला ८०० वर्षांचा इतिहास आहे हे आपल्याला दीक्षित यांनी केलेल्या कामामधून समजते.”

दीक्षित यांना संग्रहालयशास्त्र अर्थात म्युझियॉलॉजि या विषयात रस होता. त्यांनी देशातील व परदेशातील अनेक महत्त्वाच्या वस्तूसंग्रहालयाला भेट देत त्यांची पाहणी केली होती. यावेळी वस्तूसंग्रहालयांना अजून काही शिस्त लावण्याचा मानस दीक्षित यांनी व्यक्त केला होता. पुरातात्वाच्या सर्व आयामांचा दीक्षित यांचा अभ्यास चांगला होता पण त्यांचे संग्रहालय शास्त्रावर त्यांचे मोठे प्रेम होते असेही डॉ. देगलूरकर म्हणाले. दीक्षित यांना कायमच पुण्याची ओढ होती असेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

यानंतर बोलताना डॉ. वसंत शिंदे यांनी हडप्पा संस्कृतीत एक महत्त्वाचे ठिकाण असलेल्या राखीगढी येथील भारतीय पुरातत्व खात्याच्या उत्खननाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. हडप्पा संस्कृती ही स्वतंत्र संस्कृती असून वैदिक संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. राखीगढी येथे उत्खननात मिळालेल्या एका दफनातील महिलेच्या सांगाड्यातून डीएनए मिळवण्यात यश आले व  मध्य आशियातील बहुतांश लोकांची गुणसूत्रे ही हडप्पा संस्कृतीतील मानवाच्या गुणसूत्रांशी साधर्म्य असलेली असल्याची बाब समोर आणण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

राखीगढी येथील उत्खननाने भारतीय इतिहासातील २५०० वर्षांचा पडद्याआड गेलेला काळ समोर आला व ही संस्कृती जगासमोर आल्यामुळे भारताचा सांस्कृतिक इतिहास सलग ५००० वर्षापर्यंत मांडण्यात यश मिळाले. काही वर्षांपूर्वी बिलावल भुट्टो यांनी पाकिस्तानात जगभरातून २५  पुरातत्वज्ञांना पाकिस्तान मधील हडप्पा संस्कृतीची ठिकाणे जतन करण्याबाबत सल्ला घेण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यावेळी मी तेथे गेलो असता भुट्टो यांनी काशिनाथ नारायण दीक्षित व राखालदास बनर्जी या भारतीय पुरातत्वज्ञांचा आवर्जून उल्लेख केल्याची आठवण त्यांनी यावेळी सर्वांना सांगितली

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे निबंधक श्रीनंद बापट यांनी राव बहादूर काशिनाथ नारायण दीक्षित यांचा संस्थेशी असलेल्या प्रदीर्घ संबंधांवर प्रकाश टाकला. सरिता अलूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर वीणा मांद्रेकर  यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading