Sunday, November 8, 2026
ENTERTAINMENTLatest News

लहानपणीची दिवाळी ते आजची दिवाळी…  कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी!

साफसफाई, फराळ, किल्ला आणि आकाशकंदील… झी मराठीच्या कलाकारांच्या दिवाळीच्या आठवणी!

दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती घराची साफसफाई, फराळाची लगबग, नवीन कपड्यांची खरेदी, आकाशकंदील, रांगोळी, पणत्या आणि कुटुंबासोबत साजरा होणारा आनंदाचा क्षण! प्रत्येकाच्या दिवाळीच्या आठवणी वेगळ्या असतात. लहानपणी आईसोबत केलेली साफसफाई असो, मित्रांसोबत बनवलेला किल्ला असो किंवा गरमागरम फराळाचा आस्वाद असो, या आठवणी कायम मनात घर करून राहतात. काळानुसार जबाबदाऱ्या वाढल्या, कामाचं स्वरूप बदललं, तरी दिवाळीचा उत्साह मात्र कायम असतो. झी मराठीच्या कलाकारांनी त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी, सध्याची दिवाळी आणि  या सणाशी जोडलेल्या खास गोष्टी सांगितल्या.

राज हंचनाळे, म्हणजेच ‘सनई  चौघडे’ मालिकेतील जय सांगतो,”असं म्हणतात, ‘देव जेव्हा देतो, तेव्हा दोन्ही हातांनी भरभरून देतो.’ यंदा मला याचा खऱ्या अर्थाने अनुभव येतोय. या वर्षी दिवाळीत माझ्या आयुष्यात लक्ष्मी दोन रूपांत आली आहे. एक माझी छोटी मुलगी आणि दुसरं म्हणजे प्रेक्षकांचं भरभरून मिळणारं प्रेम!आमच्या शोला ‘बेस्ट शो’चा पुरस्कार मिळाला, आमच्या कामाचं कौतुक होतंय आणि रोज सोशल मीडियावर लोकांचे मेसेज येत आहेत. हे सगळं माझ्यासाठी खूप आनंददायी आणि भारावून टाकणारं आहे. प्रत्येकाचे मनापासून आभार! यंदाची दिवाळी मी माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या छोट्या लक्ष्मीसोबत पारंपरिक पद्धतीने, खूप आनंदाने साजरी करणार आहे. मी नेहमी म्हणतो की, माझे प्रेक्षक हेच माझे गॉडफादर्स आहेत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! मला अजूनही वाटतं की ही फक्त सुरुवात आहे! प्रेक्षकांसाठी अजून खूप उत्तम काम करायचं आहे. त्यासाठी तुमचे आशीर्वाद असेच कायम माझ्या पाठीशी राहू द्या.

  

विजया बाबर, म्हणजेच  कमळी सांगते,”सध्या दिवाळीच्या साफसफाईत आणि फराळ बनवण्यात माझं योगदान खूप कमी असतं. खरं तर, कुठलाही सण असला की त्याच्या तयारीच्या वेळी मी शूटिंगमध्ये व्यस्त असते. त्यामुळे सध्या आईला फारशी मदत करता येत नाही. पण लहानपणी मी दिवाळीच्या तयारीत आईला खूप मदत करायचे. घरात सगळ्यात लहान असल्यामुळे ताई, दादा आणि पप्पा आपापल्या कामासाठी बाहेर असायचे. शाळा किंवा कॉलेजमधून घरी आल्यानंतर मीच आईसोबत असायचे. त्यामुळे घराची साफसफाई आम्ही दोघी मिळून करायचो. मला फराळ बनवायला खूप आवडतं. लहानपणी मी आईला रंगरंगोटी न केलेले साधे दिवे आणायला सांगायचे. मग ते दिवे मी घरी बसून छान रंगवायचे. माझ्या हाताने रंगवलेला दिवा दिवाळीच्या दिवशी घरात लावला जातो, याचा मला खूप आनंद व्हायचा.”

रोहित परशुराम, म्हणजेच ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेतील शंकर सांगतो,”आता खरं सांगायचं तर, अभिनेता झाल्यामुळे आणि कामानिमित्त मुंबईत राहत असल्यामुळे दिवाळीशी असलेला माझा पूर्वीसारखा संपर्क थोडासा कमी झाला आहे. सध्या घरी दिवाळीच्या तयारीत फारशी मदत करता येत नाही. आई आणि भाऊ सगळी सजावट आधीच करून ठेवतात. घरात लाईटच्या माळा, आकाशकंदील, दिवे, पणत्या आणि रांगोळी सगळं तयार असतं. फराळही बनवलेला असतो. माझी बायको पूजासुद्धा नोकरी करते आणि रुई अजून लहान आहे. त्यामुळे आमची इथली दिवाळीची लगबग थोडी कमी असते. तरी आम्ही छोटासा आकाशकंदील लावतो आणि वेळ मिळेल तशी साफसफाई करतो. पण लहानपणी दिवाळीच्या साफसफाईत मी खूप सहभागी असायचो. प्रत्येक कामात पुढे असायचो. घरातले पंखे पुसण्याची जबाबदारी माझीच असायची. मी लहान होतो, पण खुर्चीवर स्टूल ठेवून दादा आणि नाना मला आधार द्यायचे आणि मी पंखे साफ करायचो. फराळ बनवतानाही आईला सगळ्यात जास्त मदत मीच करायचो. आम्ही तीन भाऊ होतो आणि घरात सगळ्यात लहान असल्यामुळे स्वयंपाकघरात आईसोबत मीच असायचो. फराळ बनवायला आणि तो खायला दोन्हीसाठी माझी मदत असायची. गरमागरम काढलेली करंजी खाण्यात जे सुख आहे, त्याच्यासारखं दुसरं सुख मला जगात कुठेच मिळालं नाही. बाबांसोबत मी भोरच्या बाजारात खरेदीला जायचो. आमच्या घरातला प्रत्येक दिवाळीचा आकाशकंदील माझ्या पसंतीचाच असायचा. मी घरातला धाकटा असल्यामुळे नाना आणि दादा नेहमी म्हणायचे, ‘तुझ्याच आवडीचा आकाशकंदील आण.’ आमच्या शाळेत आकाशकंदील बनवण्याची स्पर्धा असायची. भोरमधली ती दिवाळी, दिवाळीत पडणारी थंडी आणि धुकं या सगळ्या आठवणी मला आजही खूप आठवतात.”

शिवानी सोनार, म्हणजेच ‘तारिणी’ मालिकेतील तारिणी सांगते,”दिवाळी हा माझ्यासाठी नेहमीच आवडता सण राहिला आहे. कारण या सणाला सलग दोन-तीन दिवस सुट्टी मिळते. मला दिवाळीचा सगळ्यात आवडणारा भाग म्हणजे मालिकांमध्ये काम करत असल्यामुळे आमची दिवाळी जवळपास १०-१२ दिवस साजरी होते, असं मला वाटतं. मालिकांच्या सेटवरच्या कुटुंबासोबत आणि घरच्या कुटुंबासोबत अशा दोन्हीकडे आम्हाला दिवाळी साजरी करता येते. दोन्हीकडे फराळ असतो, फराळ बनवण्याची तयारी आणि लगबग असते. घरातही सजावट होते आणि सेटवरही सजावट होते. त्यामुळे दिवाळीचा आनंद आम्हाला जास्त दिवस घेता येतो. यंदाच्या दिवाळीसाठी मी खूप उत्सुक आहे, कारण यावर्षी घराच्या सजावटीची जबाबदारी माझी आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे मी बऱ्याच गोष्टी ऑनलाइन खरेदी करतेय. खरं तर मला दुकानात जाऊन खरेदी करायला आवडलं असतं, पण तेवढा वेळ मिळत नाही. मला एक सुंदर आकाशकंदील घ्यायचा आहे. मला षटकोनी आकाराचा, टिपिकल एकाच रंगाचा आकाशकंदील खूप आवडत. सध्या मी माझ्या आवडीचा आकाशकंदील शोधतेय. तो मिळाला की त्याच्यासोबतचा फोटो नक्कीच सोशल मीडियावर पोस्ट करेन. आम्ही कामानिमित्त मुंबईत राहतो. माझं माहेर आणि सासर दोन्ही पुण्यात आहे. माझा भाऊ बेंगळुरूला असतो. पण दिवाळी हा असा सण आहे, ज्यासाठी आम्ही सगळे एकत्र येतो आणि खूप मजा करतो. भाऊबीज असो किंवा पाडवा, या सगळ्या सणांमधून मिळणारी सकारात्मक ऊर्जा मला खूप आवडते. लहानपणी मी आणि माझा भाऊ मिळून किल्ला बनवायचो. सध्या शूटिंगमुळे तेवढा वेळ मिळत नाही, पण यंदा वेळ मिळाला तर मला नक्कीच किल्ला बनवायला आवडेल. किल्ला बनवण्यासाठी वयाचं बंधन नसतं. त्यासाठी माती गोळा करणं, वेगवेगळ्या आकाराचे दगड आणणं, पोती आणणं, धान्य तयार करणं, मावळे विकत घेणं किंवा जुन्या मावळ्यांना रंग देणं, या सगळ्या गोष्टींची एक वेगळीच मजा असते. त्यामुळे माझ्यासाठी फराळापेक्षाही दिवाळीत किल्ला बनवण्यात जास्त रस आहे.”

धाकट्या सुनबाई मालिकेतील वेदांत म्हणजेच मंदार जाधव सांगतो,”आता दिवाळीच्या तयारीत माझं योगदान म्हणजे घराच्या साफसफाईत थोडीफार मदत करणं, थोडीशी खरेदी करणं आणि अर्थातच फराळ खाणं! खरं सांगायचं तर, नवीन कपडे, फटाके आणि आईने बनवलेला छान फराळ खाण्याचीच जास्त उत्सुकता असायची. दिवाळीच्या आधी घरात नवीन कपड्यांची खरेदी, घर सजवणं, आकाशकंदील बनवणं, लाईटिंग करणं आणि वेगवेगळे पदार्थ बनवणं, या सगळ्याची एक वेगळीच मजा असायची. आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, त्यामुळे दिवाळीच्या तयारीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पण दिवाळी म्हटलं की उत्साह तोच असतो, आनंद तोच असतो आणि लहानपणीच्या आठवणी आजही मनात ताज्या होतात. माझ्यासाठी दिवाळी म्हणजे फक्त एक सण नाही, तर कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा, छान छान फराळ खाण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा एक सुंदर अनुभव आहे.”

जुई पुष्पा प्रफुल्ल गोगरी, म्हणजेच ‘सनई  चौघडे’ मालिकेतील असावरी सांगते,”दिवाळीची साफसफाई करताना खूप मजा येते. कारण आई आणि आम्ही सगळ्या बहिणी एकत्र येऊन साफसफाई करतो. त्यात कधी कधी माझी मोठी बहीण फक्त कामं सांगत बसते आणि स्वतः मात्र आराम करते. अशी मजा-मस्ती करत आमची साफसफाई होते.दिवाळीची खरेदीसुद्धा आमच्यासाठी खूप धमाल असते. रांगोळी, दिवे, लाईट्स, तोरण आणि गॅलरी सजवण्यासाठी नवीन डिझाइनचे सिरॅमिकचे दिवे असं बरंच काही आम्ही खरेदी करतो. दरवर्षी काहीतरी नवीन डिझाइन हवं असतं. या खरेदीच्या वेळी मी तिथे असणं खूप गरजेचं आहे. माझ्याशिवाय खरेदी केली तर मला राग येतो.खरेदीवरून एक छान गोष्ट आठवली. आधी दिवाळीचं सामान घेताना खर्च आई-बाबा करायचे आणि आम्ही बहिणी फक्त खरेदी करायचो. पण गेल्या तीन वर्षांपासून दिवाळीच्या सामानासाठी काय हवं, काय नको, याची खरेदी मी करते. आता स्वतः कमावून आपल्या घराची जबाबदारी पार पाडतेय, याचं खूप छान वाटतं.फराळ बनवतानाही आम्ही सगळे एकत्र बसतो. प्रत्येक दिवशी एकेक पदार्थ बनवतो. आमच्या घरी बाहेरून एकही फराळाचा पदार्थ आणला जात नाही. लहानपणी फराळ बनवताना सगळे घरी एकत्र बसायचे. पण मी मात्र कधी कधी आमच्या शेजाऱ्यांकडे जाऊन फराळ बनवायला मदत करायचे आणि तिथेच रमायचे.  रांगोळी काढणं कधीच चुकलं नाही. दरवर्षी मी माझी बहीण निकितासोबत रांगोळी काढायचे. आता तिचं लग्न झालं आहे आणि ती हैदराबादला असते. त्यामुळे रांगोळी काढताना तिची खूप आठवण येते. आम्ही दोघीच रांगोळी काढायचो आणि मग आई-बाबा आणि इतर बहिणींना सारखं विचारायचो, ‘छान दिसतेय ना? बरोबर आहे ना?’असा हा आमच्यासाठी खूप आनंदाचा सण आहे. सगळ्यांनी एकत्र येणं, मजा-मस्ती करणं, साड्या नेसून फोटो काढणं आणि पूजा करणं, या सगळ्या गोष्टी आम्ही खूप आनंदाने करतो.”

 

निखिल दामले, म्हणजेच ‘कमळी’ मालिकेतील ऋषी सांगतो, ” दिवाळी  हा वर्षातील माझ्या सगळ्यात आवडत्या आणि आतुरतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या सणांपैकी एक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे माझी आई आणि आजी बनवतात तो फराळ! दरवर्षी आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. आम्ही सगळे मिळून छान पार्टी करतो, फराळाचा आस्वाद घेतो आणि अनेक खेळ खेळतो.यंदा शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे दिवाळीच्या तयारीत आणि साफसफाईत मला फारसं योगदान देता येणार नाही. पण लहानपणीची माझी दिवाळीची सगळ्यात सुंदर आठवण म्हणजे मित्रांसोबत किल्ला बनवणं. आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करायचो आणि किल्ला बनवण्याच्या स्पर्धांमध्येही भाग घ्यायचो.”

ट्विंकल यादव, म्हणजेच ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेतील गौरी सांगते,”दिवाळी म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा सण. या सणाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात, फराळ बनवतात आणि वेगवेगळे खेळ खेळतात. लहानपणी मी दिवाळीला गावी जायचे. तिथे सगळे एकत्र बसून फराळ बनवायचे आणि मी ते सगळं आवडीने पाहायचे. थोडीफार मदतही करायचे, पण माझं मुख्य लक्ष असायचं ते फटाके फोडण्याकडे!पण आता परिस्थिती बदलली आहे. दिवाळीच्या खरेदीपासून ते घरात काय हवं आणि काय नको, याची चर्चा मी आईसोबत करते आणि खरेदीतही सहभागी होते. आता फक्त छोटी-मोठी मदत न करता फराळ बनवण्यातही मी आवडीने मदत करते.”

Leave a Reply