Saturday, November 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

“नवीन घर, लग्नानंतरची पहिली दिवाळी आणि नवीन मालिकेचं काम… यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूप खास आहे!” – पूजा बिरारी

‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेतील शिवानी अर्थात पूजा बिरारीची लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची खास तयारी!

अभिनेत्री पूजा बिरारीसाठी यंदाची दिवाळी अनेक नव्या सुरुवातींचा आनंद घेऊन आली आहे. लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घरातील सणाचा उत्साह आणि झी मराठी वर ‘येतेच आता मी नांदायला’ या मालिकेच्या निमित्ताने सुरू झालेला नवा प्रवास, अशा अनेक खास गोष्टी यंदाच्या दिवाळीला जोडल्या गेल्या आहेत. झी मराठीवरील नवीन मालिकेत शिवानीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बिरारीसाठी यंदाची दिवाळी कशी  खूप खास होणार आहे या विषयी सांगितलं.

पूजा सांगते, “लहानपणी माझी दिवाळी मामाच्या गावाला आजी-आजोबांकडे साजरी व्हायची. त्यानंतर कॉलेजच्या दिवसांत पुण्यात दिवाळी साजरी करायचे. खरं तर लहानपणापासूनच फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम यांची मला माहिती होती. त्यामुळे अगदी दोन-तीन फटाके फोडून, पण भरपूर दिवे लावून मी दिवाळी साजरी केली आहे. आई-बाबांनी मला कधीच फटाके फोडण्यापासून थांबवलं नाही, पण त्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले होते. त्यामुळे लहान वयातच दिवाळीची खरी मजा फटाक्यांमध्ये नसून कुटुंबासोबत वेळ घालवण्यात आणि इतर गोष्टींचा आनंद घेण्यात आहे, हे मला समजलं.

शाळेत असताना एक-दोन वेळा आम्ही घरीच क्राफ्ट पेपर आणून आकाशकंदील बनवला होता. त्याचे सुंदर रंग, त्यातून येणारा प्रकाश आणि एकूणच आकाशकंदील ही गोष्ट मला खूप आवडते. किल्ला मात्र मी स्वतः कधीच बनवला नाही. माझा दादा किल्ला बनवायचा आणि मी ते सगळं बघायचे. त्यासाठी दादाची खूप धडपड व्हायची. दिवाळीच्या आधी फराळ बनवताना संपूर्ण घरात दरवळणारा सुगंध आणि अभ्यंगस्नान झाल्यावर कोवळ्या उन्हात बसून सगळ्यांनी एकत्र फराळ खाणं, ही आमच्या घरातली खास परंपरा आहे. दिवाळी संपल्यानंतरही बरेच दिवस फराळ खाणं सुरूच असतं. त्यातही एक वेगळीच मजा आहे.

मला आधी चकली खूप आवडायची. मला गोड पदार्थ तसे कमी आवडतात, पण हल्ली शंकरपाळी, करंजी आणि बेसनाचे लाडूही आवडायला लागले आहेत. दिवाळी म्हटलं की शॉपिंग तर सगळ्यात आधी असतेच! घरासाठी काहीतरी नवीन खरेदी करणं, घरातल्या सगळ्यांसाठी नवीन कपडे घेणं आणि भाऊबीजेसाठी भेटवस्तूंची खरेदी करणं हे माझ्यासाठी अगदी ठरलेलं असतं. मुळात दिवाळी हा माझा सगळ्यात आवडता सण आहे. इतका की नवीन वर्षाचं कॅलेंडर हातात आल्यावर मी सगळ्यात आधी दिवाळी कधी आहे, हे बघते.

यंदा नवीन  मालिका ‘येतेच आता मी नांदायला’ कामही दिवाळीत सुरू आहे. त्यामुळे माझ्या दोन आवडत्या गोष्टी एकत्र आल्या आहेत आणि दुहेरी आनंद मिळतोय. त्यात लग्नानंतरची पहिली दिवाळी असल्यामुळे उत्साह आणखी वेगळा आहे. शॉपिंगचाही उत्साह खूप आहे. दिवाळी खूप आनंदात साजरी होणार आहे. पहिला पाडवाही आहे. सोहमला ओवाळणं आणि ओवाळणी म्हणून मिळणारं गिफ्ट, याबद्दल तर मला खूप उत्सुकता आहे. यंदाची दिवाळी नवीन घरात, नवीन पद्धतीने आणि नवीन कामाच्या सुरुवातीसोबत खूप छान साजरी होणार आहे. सध्या शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मला स्वतःला फराळ बनवायला वेळ मिळाला नाही. पण कालच माझ्या सासूबाईंनी बेसनाचे लाडू आणि आजीने शंकरपाळी बनवली. थोडक्यात सांगायचं तर मी काही बनवलं नाही, पण फराळ मात्र नक्कीच खाल्ला! आमच्या ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेचा सेट माझं दुसरं कुटुंब आहे.

एकीकडे पूजा म्हणून मी बांदेकरांच्या घरी नांदायला आले आहे, तर दुसरीकडे शिवानी कदम म्हणून प्रेक्षकांच्या मनात ‘येतेच आता मी नांदायला’ .

तेव्हा तयार व्हा, ठकूबाईंच्या घरात प्रेमाची नवी सुरुवात अनुभवण्यासाठी! पाहायला विसरू नका, ‘येतेच आता मी नांदायला’, ३० नोव्हेंबरपासून सोम – शुक्र रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर !

Leave a Reply