Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRA

पाचगणी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचा व घन कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा देश पातळीवर डंका

पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेला आरोग्य विभाग तसेच घनकचरा प्रक्रिया प्रकल्पला देश पातळीवर महत्त्वाचे समजले जाणारे ISO 9001:2015 मानांकन नुकतेच मिळाल्याने महाराष्ट्रातील ISO मानांकन प्राप्त करणारी पाचगणीची नगरपरिषद पहिली नगरपरिषद बनण्याचा मान पाचगणी नगरपरिषदेने पटकवला आहे.

आरोग्य विभाग व स्वच्छ भारत पॉईंट येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प (वेस्ट प्रोसेसिंग प्लॅन्ट) मध्ये राबवलेल्या उत्कृष्ठ कार्यप्रणाली बद्दल ISO 9001:2015 हे प्रमाणपत्र नगरपरिषदेस प्राप्त झाले असून देशपातळीवर नगरपरिषदेने नवलौकिक मिळवले आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी तसेच सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे मानले जाणारे थंड हवेचे ठिकाण पाचगणीसाठी गौरवाची बाब आहे. पाचगणी हे पर्यटन स्थळ भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असून त्यामध्ये ISO 9001:2015 मानांकन या प्रमाणपत्राची भर पडली आहे. अशी माहिती पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेतील प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.

जाधव म्हणाले की पाचगणीतील स्वच्छ भारत पॉईंट हे कचरा व्यवस्थापनाचे एक उत्कृष्ट उदाहरण असून शहरातील कचऱ्याची प्रभावीपणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हे केंद्र अहोरात्र कार्यरत आहे. ओल्या कचऱ्यापासून वीज आणि खत निर्मिती केली जाते, तर सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर केला जातो. धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष पद्धतीचा वापर केला जातो. आरोग्य आणि कचरा व्यवस्थापन याची सुयोग्य सांगड नगरपरिषदेने घातल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य उंचावले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेतील प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव, तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी आणि श्रद्धा दर्यापूरकर, अध्यक्ष, स्वयंप्रभा फाउंडेशन यांच्या अथक प्रयत्नातून व उत्कृष्ट कामगिरीतून स्वच्छ भारत पॉइंट येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प व आरोग्य विभागाला मिळालेले ISO 9001:2015 मानांकन हे यश केवळ पाचगणीसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी व महाराष्ट्रासाठी गौरवशाली बाब आहे. पाचगणी हे सुंदर पर्यटनस्थळा बरोबर स्वच्छता आणि शाश्वततेचे प्रेरणादायी मॉडेल बनले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे पाचगणी नगरी परिषदेवरती महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading