जपान कॉन्सुलेट जनरलकडून विद्यापीठाला ६५ पुस्तके भेट
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मुंबईतील जपान कॉन्सुलेट जनरलकडून जपानचे विविध पैलू दाखवणारी ६५ पुस्तके भेट देण्यात आली आहेत. कुलगुरू कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जपानचे मुंबईतील कौन्सुल जनरल श्री. यागी कोजी यांनी कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी यांना पुस्तकांचा भेट संच दिला. याप्रसंगी कॉन्सुलेट जनरल, मुंबई येथील सांस्कृतिक आणि माहिती विभागातील कौन्सुल मेगुमी हामूरो, माजी भारतीय उच्चायुक्त डॉ. ज्ञानेश्वर मुळे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव आणि संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ) विजय खरे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विविध देशातील नामांकीत विद्यापीठांशी शैक्षणिक देवाणघेवाण सुरू आहे. आजच्या या कार्यक्रमामुळे जपानशीही आपण जोडले गेलो आहोत. लवकरच हे संबंध पुढे नेऊन शैक्षणिकदृष्ट्या चर्चा पुढे नेण्यात येईल, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी यांनी केले. तर या कार्यक्रमामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि जपान यांच्यातील डायलॉग सुरू झाला आहे. पुढे उच्चशिक्षणासाठी दोघेही एकत्र येऊन काम करतील. तसेच स्टुडेंट आणि फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्रॅम सुरू करण्यावर चर्चा करतील, असे जपनाचे मुंबईतील कौन्सुल जनरल श्री. यागी कोजी म्हणाले.
विद्यापीठातील संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग आणि जपान कॉन्सुलेट जनरल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २००८ पासून निप्पोन फाऊंडेशनच्यावतीने ‘रीड जपान प्रोजेक्ट २०२३’ चालवला जात आहे. पुस्तकांद्वारे जपानची ओळख जगाला व्हावी, असा या प्रोजेक्टचा उद्देश्य असून यातंर्गत जगभरातील शिक्षण संस्थांना जपानवर इंग्रजी भाषेत लिहिलेली पुस्तके भेट देण्यात येतात. या प्रोजेक्टअंतर्गतच मंगळवारी जपान कॉन्सुलेट जनरल, मुंबईकडून ही पुस्तकांची भेट विद्यापीठाला देण्यात आली. जपानच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक इत्यादी विषयांचे विविध पैलू दाखवणाऱ्या पुस्तकांचा या संचात समावेश आहे. ही पुस्तके विद्यापीठातील सामरिक शास्त्र विभागातील ग्रंथालयात संग्रहीत करण्यात आली आहेत.
