सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘विद्यापीठांच्या वित्तीय बाबी’ या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यशाळेचे उद्घाटन
पुणे:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व उच्च शिक्षण संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यापीठांच्या वित्तीय बाबी’ या विषयावरील दोन दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात सुरू असलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी, प्र- कुलगुरु प्रा. (डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे, सुकाणू समिती सदस्य अनिल राव आदी मान्यवरांच्या उपस्थिती उद्घाटन संपन्न झाले.
याप्रसंगी डॉ. प्रशांत मगर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत होणाऱ्या वित्तीय बदलाबाबत तसेच विद्यापीठांच्या आर्थिक विकासाबाबत प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. राज्यातील अकृषी विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, समूह विद्यापीठ, अभिमत विद्यापीठातील मुख्य वित्त लेखा अधिकारी, उप वित्त लेखा अधिकारी, उपकुलसचिव (वित्त व लेखा विभाग) यांच्या करीता ‘विद्यापीठांच्या वित्तीय बाबी’ या विषयावर दि. १५ व १६ मे २०२४ रोजी दोन दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
राज्यातील विविध विद्यापीठांच्या वित्त व लेखा बाबी संदर्भात विविध शासन निर्णय, आदेश,परिपत्रके अंमलबजावणी करीता शासनातर्फे वेळोवेळी जारी करण्यात येतात. या शासन निर्णय, आदेश,परिपत्रकानुसार विद्यापीठांचे वित्तीय कामकाज सुकर होण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सीए चेतन डागा, सीए प्रीतम माहुरे, अनिल राव आदी तज्ञ १५ मे ला या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. तर १६ मे रोजी सीए मनोज चांडक, सीए पराग राठी, सीए मिलिंद लिमये, सीए डॉ. दिलीप सातभाई आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे.
अकृषी विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, समूह विद्यापीठ, अभिमत विद्यापीठातील मुख्य वित्त लेखा अधिकारी, उप वित्त लेखा अधिकारी, उपकुलसचिव (वित्त व लेखा विभाग), उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्रालयीन अधिकारी, संचालयनातील अधिकारी/ कर्मचारी, सनदी लेखापाल, तज्ज्ञ मार्गदर्शक आदी या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.
