पहिल्या मतदानाचा युवा मतदारांच्या चेहऱ्यावर आनंद
पुणे : गेल्या तीन वर्षात पद्धतशीर प्रयत्न केल्यामुळे जिल्ह्यात नव मतदारांच्या नोंदणीला उत्तम प्रतिसाद मिळाला. असंख्य युवा मतदार मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. मावळ, पुणे, शिरूर लोकसभा मतदार संघात आपल्या पहिल्याच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या युवा मतदारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
युवा मतदार आपल्या मित्रमैत्रिणी आणि पालकांसोबत मतदान करायला केंद्रावर जाताना विविध ठिकाणी दिसत होते. प्रथमच मतदान करायचे असल्याने त्यांना मतदानाच्या प्रक्रियेबद्दल कुतूहलही होते. सर्व केंद्रावर नियमानुसार मतदान प्रक्रिया सुरळीत असल्याचे पाहून निवडणूक आयोगाचे आणि प्रशासनाचे कामकाज शिस्तीत सुरू असल्याबाबत काहींनी अभिमानाची भावना व्यक्त केली.
भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी आपण प्रत्येक वेळी मतदान करणार आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ असा निर्धार हे नवमतदार व्यक्त करताना दिसत होते.
झुबिया शेख: मी मतदानाचा हक्क प्रथमच बजावत आहे. आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी माझ्या एका मतानेही योगदान देता येते. त्यामुळे मला खूप आनंद होत आहे.
देवराणी कुदळे: मी प्रथमच पालकांसोबत मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर वृद्ध नागरिक, दिव्यांग यांना प्राधान्य देण्यात येत होते. मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी चांगली तयारी केली होती. नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रावर मतदान ओळ्खपत्राची व पडताळणी खूप कमी वेळात करत असल्याने कोणतीच अडचण येत नव्हती. मतदान केल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळाला.
