मावळ लोकसभा निवडणूक निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज –दीपक सिंगला
पुणे : मावळ लोकसभा मतदासंघाकरीता सोमवार १३ मे रोजी मतदान होत असून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. ही मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीअंतर्गत मतदानाच्या तयारीची माहिती माध्यमांना देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस उप अधीक्षक सत्य साई कार्तिक, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिंमत खराडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के आदी उपस्थित होते.
मावळ लोकसभा मतदार संघातील मतदार संख्या, मतदान यंत्रांची आकडेवारी, मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, टपाली मतदानाची आकडेवारी, आचारसंहिता कालावधीत केलेली कारवाई, संवेदनशील तसेच विशेष मतदान केंद्रांची माहिती, मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या मनुष्यबळाची माहिती, गृहमतदानाची आकडेवारी, आदर्श मतदान केंद्रांची माहिती, वाहतूक आराखडा तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर असलेल्या विविध निर्बंध आणि त्याबाबतच्या नियमावलीबाबत दीपक सिंगला यांनी सविस्तर माहिती दिली. मावळ मतदारसंघात एकूण १६ संवेदनशील मतदान केंद्रे असून या मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सत्य साई कार्तिक म्हणाले, मतदान प्रक्रिया भयमुक्त व निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेद्वारे पोलीस गस्त, पोलीस पथ संचलन तसेच प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. पोलीस बंदोबस्तासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
११ हजार ४८४ अधिकारी कर्मचारी नियुक्त
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सुमारे २ हजार ५६६ मतदान केंद्रांसाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक असे एकूण ११ हजार ४८४ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच २९१ सेक्टर अधिकारीदेखील नेमण्यात आले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय रविवार १२ मे रोजी मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्याचे वितरण केले जाणार आहे.
मतदान केंद्रावर विविध सुविधा
प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच पिण्याचे पाणी, व्हिलचेअर व्यवस्था, उन्हापासून बचाव होण्यासाठी शेड, प्रतिक्षा कक्ष तसेच प्रथमोपचार पेटीसह ओआरएस सुविधाही देण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती दीपक सिंगला यांनी दिली.
नियंत्रण कक्षाद्वारे लक्ष ठेवणार
मतदानाच्या दिवशी संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ५० टक्के मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली आहेत. तसेच संपुर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून तात्काळ समन्वय करण्यासाठी आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रत्येकी १ असे एकूण ७ नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत.
विविध पथकांद्वारे केलेली कामगिरी
मावळ लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात ४४ भरारी पथक, १९ तपासणी पथक, ३८ स्थिर सर्वेक्षण पथक, १२ व्हिडीओ सर्वेक्षण पथक, ६ कृती दलासह ईव्हीएम सुरक्षा पथक आणि इतर आवश्यक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या असून या पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत १ कोटी ४९ लाख रुपये रोख, ६९ लाख ४० हजार रुपये किंमतीचे मद्य, ६२ लाख ४७ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, १ कोटी ९८ लाख रुपये किंमतीचे मौल्यवान वस्तू, २० वाहनांमधून ३९ लाख १२ हजार रुपये किंमतीचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच संबंधितांवर विविध कलमांच्या आधारे एकूण २७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती दीपक सिंगला यांनी दिली.
