पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांनाच भाजपची पुण्यातून उमेदवारी : सुनील केदार
पुणे : कसब्याचे आमदार, पालकमंत्री व नंतर खासदार अशी विविध पदे भूषवणारे पुण्याचे नेते गिरीश बापट यांच्या विरोधी भूमिका घेऊन त्यांचे व भाजपचे शहर कार्यालय तोडणाऱ्या, तसेच वारंवार पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या उमेदवारालाच भाजपने पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे हे दुर्देवी आहे. असे प्रतिपादन राज्याचे माजी क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केले.
कॉंग्रेसच्या वतीने लोकसभा निवडणुकीत पुण्यात निरीक्षक म्हणून आलेल्या सुनील केदार तसेच ज्येष्ठ पत्रकार सुनील माने यांनी आज पत्रकार भवन येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला माजी आमदार उल्हासदादा पवार ही उपस्थित होते.
सुनील केदार म्हणाले, सध्याचे पुण्याचे उमेदवार असलेले मुरलीधर मोहोळ यांनी २००७ साली पुण्याचे नेते गिरीश बापट व भारतीय जनता पक्षाचे कार्यालय तोडले होते. त्यावेळी अनेक नेत्यांचे आणि महापुरुषांचे फोटो खाली पडले होते. अशाप्रकारचा माणूस हा बापट साहेबांची जागा घेऊ शकत नाही. ही होऊ घातलेली लोकसभेची निवडणूक ही विचारांची लढाई आहे. त्यामुळे पुण्याचा खासदार हा महात्मा फुले आणि लोकमान्य टिळकांचा वैचारिक वारसा असावा अस ते म्हणाले.
खेळाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती होते, त्यामुळे राज्याचा क्रिडा मंत्री असताना मी राज्यात क्रिडा विद्यापीठ व्हावे असा कायदा सभागृहात मंजूर करून घेतला. त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाकडूनही परवानगी मिळवून आणली मात्र दुर्देवाने तत्कालीन राज्यपाल आणि सध्याच्या राजकीय अनास्थामुळे पुण्यात होऊ घातलेल्या या विद्यापीठाचा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
सुनील माने म्हणाले, मी अनेक वर्ष बापट साहेबांबरोबर काम केलं. बापट साहेबांचे नेतृत्व सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी होते. ते पुण्याच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. सध्या मात्र भाजपचा उलट प्रवास होत आहे. मोदींच्या नेतृत्वातील सरकार देशात विषमता पसरवत आहे. राज्यघटनेनुसार मागासवर्गीयांच्या विकासाठी राखीव निधी देणे आवश्यक आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागासवर्गीयांच्या विकासासाठी असलेला ५ लाख ५० कोटी रुपयांचा निधी गोठवला. या सरकारला अनेक लोक कंटाळले असून अस्वस्थ आहेत.
दिवंगत गिरीश भाउंनी ज्यावेळी पक्षाकडे लोकसभेचे तिकीट मागितले त्यावेळी मुरलीधर मोहोळ सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र पक्षाने बापट साहेबांचा लोकसभेसाठी विचार केला व मुरलीधर मोहोळ यांना त्यांचे प्रचार प्रमुख केले. यातून नाराज झालेल्या मोहोळ यांनी प्रचार न करता सिंगापूरला सुट्टीला जाणे पसंत केले. याबद्दल बापट साहेबांना मनस्वी खूप दु:ख झाले होते. भाजपच्या तत्कालीन शहरअध्यक्षांनी सुद्धा प्रचारात फारसा सहभाग घेतला नव्हता.
विकासाच्या मुद्यावर बापट साहेबांचे व्हिजन एकदम पक्के होते. मुरली मोहळ महापौर होते तेंव्हा बालगंधर्वचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता. काही कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र ही खूप जुनी आणि ऐतिहासिक वास्तू असल्याने अशा स्वरुपाची कामे पुण्यात झाली नाही पाहिजेत. निधी डोळ्यासमोर ठेऊन जर आपण अशा पद्धतीची कामे करू लागलो तर पुण्याचा विकास पुढे जाणार नाही. असे म्हणत त्यांनी याला विरोध केला होता.
भाजपच्या जाहीरनाम्यात पुण्याचे अनेक प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली आहे. त्यातील एक मुद्दा म्हणजे पुण्याच्या वाहतुकीचा, हा सर्वात कुशल मुद्दा आहे आणि तो मोहोळ यांना सोडवता येणार नाही. हे प्रश्न सोडवण्याचा शहर भाजपच्या कोणत्याही नेत्याचा आवाका नाही. ते एक करायला जातात तर दुसर वाढवून ठेवतात. नळस्टॉप चौकातील उड्डाणपूल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तेथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल केला मात्र तेथील सर्व वाहतूक पुढील चौकात आणून सोडली त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी कमी होण्यापेक्षा वाढत आहे. अशाप्रकारे केलेल्या कामांमुळे पुणेकरांच्या करातील करोडो रुपये वाया जात आहेत.त्यामुळे कंटाळलेले लोक पुण्यातून बाहेर पडत आहेत. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांना रस्ते, पाणी, वीज यांसारख्या प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे भाजपला सत्ता असूनही जमले नाही.
बापट साहेबांनी जवळपास ३० वर्ष कसब्याचे नेतृत्व केले पण त्यांनी कधी पुण्येश्वराचा मुद्दा काढला नाही. मात्र नितेश राणे सारख्या जहाल लोकप्रतिनिधीने पुण्यात येऊन त्याबद्दल मोर्चा काढणे, यावरून पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणे हे दुर्देवी आहे. त्याचे संयोजन मुरलीधर मोहोळ यांनी केले होते. ही त्याहून मोठी शोकांतिका आहे. अशी खंत ही माने यांनी यावेळी बोलून दाखवली.
दीड तासाच्या पावसामुळे पुण्याच्या स्मार्ट सिटीची पोलखोल
विविध पक्षात राहून उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे अजित पवारांसह महापौर म्हणून काम केलेले मुरली मोहोळ पुण्याच्या विकासाचे श्रेय घेतात, मात्र कालच्या दीड तासाच्या पावसामुळे पुण्याच्या स्मार्ट सिटीची पोलखोल केली. रस्त्यावर पाणी साचून लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. विकासाच्या बाता मारणाऱ्या अजित पवारांनी तसेच पुण्याचे महापौरपद भूषवणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी यावर उत्तर द्यावे असे केदार म्हणाले.
