येत्या १० मे रोजी ‘राईज’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नव्या पिढीतील आश्वासक कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पुण्यातील इंडी म्युझिकॉन्स व रोहन बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राईज’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातील पहिला कार्यक्रम येत्या शुक्रवार दि. १० मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. सेवा भवन, मत्स्यगंधा – भालेकर उपहारगृहा जवळ, कै गुळवणी महाराज पथ, पटवर्धन बाग, एरंडवणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे.
सदर कार्यक्रमात संगीत नाटक अकादमीच्या वतीने उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले सारंग कुलकर्णी यांचे सरोद वादन होईल. तसेच सूर-रत्न पुरस्कार प्राप्त गायिका सानिका कुलकर्णी यांचे गायन होईल. यावेळी तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते सारंग कुलकर्णी यांच्या सत्कार देखील करण्यात येईल.
