Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

‘विधायक’ कार्यकर्त्यांनी केले उत्सवाला सन्मार्गाच्या दिशेने नेण्याचे काम – राहुल सोलापूरकर

पुणे : काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरुप बदलत गेले. मात्र, सामाजिक, वैज्ञानिक आणि विधायक विषय समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम देखाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी केले. विधायकता एकत्र येते, तेव्हा उत्सव सन्मार्गाच्या दिशेने जातो. अशा उत्सवातून आॅक्सिजन व शुद्धता देण्याचे काम पडद्यामागे काम करणा-या ‘विधायक’ अशा गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी केले आहे, असे मत प्रख्यात अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.

विधायक पुणे, चंदुकाका सराफ ज्वेल्स आणि पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचातर्फे गणेशोत्सवात भक्तीभावाने कार्यरत असलेल्या गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा राजेशाही सन्मान पूना गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आला. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, चंदूकाका ज्वेल्सचे जनसंपर्क अधिकारी आनंद देवगोजी, किशोर सरपोतदार, विधायक पुणेचे आनंद सराफ, शिरीष मोहिते, पराग ठाकूर, अजित कुमठेकर आदी उपस्थित होते.

गणेशोत्सवात पडद्यामागे राहून काम करणारे शाहीर दादा पासलकर, किशोर दाभाडे, अनंता कावणकर, ॠषिकेश परांजपे, अ‍ॅड.शिरीष थिटे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. चांदीचे कडे, उपरणे, श्रीगणेशाची प्रतिमा, मिठाई, फुलांची परडी असे सन्मानाचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे यंदा दुसरे वर्ष होते.

महेश सूर्यवंशी म्हणाले, गणेशोत्सवाचे पुणे हे सर्वोच्च केंद्र आहे. गणेशोत्सवाचा लौकिक वाढविणा-या कार्यकर्त्यांचा सन्मान होत असून ही आनंदाची बाब आहे. उत्सवाला ख-या अर्थाने दिशा देणारे हे कार्यकर्ते आहेत. समाज अडचणीत असताना धावून जाणा-या या संवेदनशील कार्यकर्त्यांची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचे काम समाजासमोर यायला हवे.

आनंद सराफ म्हणाले, गणेशोत्सव हा अर्थव्यवस्था व रोजगाराला चालना देणारा उत्सव आहे. तब्बल ६० हजार कोटी रुपयांची उलाढाल यामाध्यमातून होते. उत्सवात प्रत्येक समाजघटक सहभागी होतो, हे सामाजिक समरसतेचे मोठे उदाहरण आहे. त्यामुळे यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनगट व मन बळ करण्यासाठी हा सन्मान केला जातो, असेही त्यांनी सांगितले. पुरस्कारार्थींनी देखील मनोगत व्यक्त केले. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading