Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

मूल व पालकांमध्ये संवादसेतू निर्माण होणे आवश्यकपालकांनो मुलांचेही ऐका.. नंतर व्यक्त व्हा!

 

पुणे : लहान मुले म्हणजे लहान माणूसच असतो. प्रत्येक मुलाला स्वतंत्र व्यक्तिमत्व असते या भावनेतून मुलांशी संवाद होणे आवश्यक आहे. पालक हे मुलांसाठी आदर्श असतात. त्यामुळे मुलांसमोर कसे वागावे ही पालकांची जबाबदारी आहे. अगदी आदर्श घर कुठेच नसते कारण माणूस म्हटले की मतभेद, ताणतणाव, रडारडी, आरडाओरडा होणारच. पण त्याची वारंवारता किती असावी याचे भान कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने सांभाळणे आवश्यक आहे. अतिलाडाने मुलाला ‌‘मम्माज्‌‍ बॉय’ आणि मुलीला ‌‘लाडली परी’ बनवू नका, असा सल्ला समुपदेशकांनी पालकांना दिला.
‌‘भावार्थ’ आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘भावार्थ साहित्य दालन’, सक्सेस स्क्वेअर, कर्वेपुतळ्याजवळ, कोथरूड येथे गेल्या पाच दिवसापासून बालसाहित्य महोत्सव सुरू आहे. बालसाहित्य महोत्सवात   ‌‘लहान मुलांशी बोलावे कसे’ या विषयावर स्वनिल फांऊडेशनतर्फे संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्मिता पाटील आणि सोनाली दिवाकर यांचा सहभाग होता. या वेळी त्यांनी मुलांचे बालपण, पालकत्व, परस्परातील संवाद याविषयी मते मांडली.
सोनाली दिवाकर म्हणाल्या, बाळ तान्हे असल्यापासून शिकण्याची प्रक्रिया सुरू असते. पालक त्यांचे आदर्श असतात त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढते. लहान मुल घरामध्ये चोवीस तास सीसीटिव्ही कॅमेऱ्यासारखे घरातील व्यक्तींचे निरीक्षण करीत असतात. मुलांशी संवाद साधणे महत्वाचे आहे त्याप्रमाणेच त्यांचे विचार त्यांच्या भावनांना व्यक्त व्हायला संधी देणे आवश्यक आहे. मुलाला दबावाखाली ठेवल्यास मूल कधी बंडखोर होते तर कधी स्वत:च्या कोषात जाते. मुलाला आपण कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहोत याची जाणीव असू द्या. त्यामुळे घरातील प्रत्येक छोटा-मोठा निर्णय घेताना मुलाला मत मांडण्याची संधी द्या. घरामध्ये सहज-आनंदी वातावरणात विविध विषयांवर संवाद होणे आवश्यक आहे. मूल व पालकांमध्ये संवादसेतू निर्माण होणे आणि मूल व्यक्त होत असताना उत्तम श्रोता होणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना कुठल्याही विषयावर पालकांशी बोलता येणे हा विश्वास नात्यात निर्माण होणेही आवश्यक आहे. या प्रमाणेच मुलाला एका ठराविक व्यक्तिमत्वाच्या चौकटीत अडकवू नका तसेच नकार पचविण्याचीही सवय लावा.
पालकांना विविध भूमिकांमधून वागताना पाहून मूल स्वप्रतिमा निर्माण करीत असते असू सांगून स्मिता पाटील म्हणाल्या, मुलांना परावलंबी बनवू नये. घरात अति संवादाने मूल परावलंबी होऊ शकते. प्रेम म्हणजे मुलाला स्वतंत्र करणे होय बांधून ठेवणे नव्हे. मुख्यत्वेकरून किशोरवयीन मुलांसाठी घरात वातावरण मोकळे असावे कारण या काळात मुलांच्या मेंदूमध्ये अनेक बदल होत असतात. पालकांनी या काळात मुलांना पुरेसा वेळ दिला नाही तर त्यांच्यातील मोकळा संवाद कमी होत जातो आणि ही मुले घराबाहेर मानसिक-भावनिक आधार शोधतात. मूल आणि पालकांमध्ये ऐकण्याचा धागा जुळणे आवश्यक असते. बाहेरच्या जगाशी सामना करताना मुलाला पालकांनी दिलेला मानसिक आधार महत्वाचा ठरतो. याकरिता पालक सहृदयी पण ठाम असणे आवश्यक आहे. प्रत्येक घरामध्ये कुटुंब गप्पा होणे आवश्यक आहे. संवाद हा फक्त बोलण्यानेच नाही तर वागण्यानेही साधता येतो. मान्यवरांचे स्वागत भावर्थचे सल्लागार प्रसाद मिरासदार यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार श्रद्धा मयेकर यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading