Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

उत्तर रामायणावरील काम प्रभावित करणारे; खासदार मेधा कुलकर्णी यांचे मत

पुणे  – आपल्याकडे गीत रामायणाचा प्रभाव कायमच मोठा राहिला आहे. आता उत्तर रामायणावर झालेले काम देखील प्रभावित करणारे असल्याचे मत राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

लव्हबर्ड्स पब्लिकेशनतर्फे ‘संगीत उत्तर रामायण’ या पुस्तकाचा आणि अल्बमचा प्रकाशन समारंभ बाल शिक्षण मंदिर शाळेच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, संगीतकार केदार पंडित, लेखक अभिजित जोग, पुस्तकाचे लेखक कवी अशोक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संगीत उत्तर रामायण अल्बम मधील निवडक गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच संगीत उत्तर रामायण या युट्युब चॅनलचे उद्घाटन खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

भारतामध्ये देवतांच्या बद्दलचे विश्लेषण करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला धर्माने दिले आहे. त्यामुळे आपण पुरुषोत्तम रामाची जी भक्ती करतो ती आंधळी नसून डोळस आहे. भगवान राम देवाचे अवतार होते. त्यांच्या आयुष्यात त्यांना आलेली दुःखे प्राचीन वाङ्मयात लिहिलेली आहे. आपली संस्कृती धर्म हा समृद्ध असल्याचे खासदार कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.

भारताला राष्ट्र बनवण्याचे काम हे रामायण आणि महाभारताने केले आहे. राम कथांनी आपल्याला सभ्यतेचा अर्थ शिकवला आहे, त्यामुळे या कथा सर्वत्र प्रसिद्ध असल्याचे लेखक अभिजित जोग यावेळी म्हणाले.

रामायणाच्या माध्यमातून जगाला आदर्शाचा पाठ मिळाला आहे. रामायण हे भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ असल्याचे अशोक जोशी यावेळी म्हणाले.

उत्तर रामायणाचे काम करताना एक वेगळी संधी मिळाली. अशोक जोशी यांनी लिहिलेले शब्द सुंदर आहेत, त्यामुळे त्याला चाली लागत गेल्या आणि उत्तम काम होऊन गेले अशी भावना संगीतकार केदार पंडित यांनी यावेळी व्यक्त केली.

रामायण हा ग्रंथ भारतीय संस्कृतीचा आत्मा असल्याचे स्वाती केदारे यांनी मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विघ्नेश जोशी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading