तब्बल ३१८ मूकबधिर मुलांना श्रवणयंत्र मोल्ड वाटप
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाऊंडेशन व महाट्रान्सको यांच्या संयुक्त विद्यमाने स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तब्बल ३१८ मूकबधिर मुलांना श्रवणयंत्र मोल्ड चे वाटप करण्यात आले. सूर्योदय फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल याविषयी जनजागृती करीत आहेत, हे विशेष.
यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, मंगेश सूर्यवंशी, राजेंद्र पायमोडे, विजय चव्हाण, तुषार रायकर, विलास रासकर, सुभाष सूर्यवंशी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुनील रासने म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सूर्योदय फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाला प्रारंभ झाला. मागील आठ महिन्यांपासून अनेक रुग्णांना यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. केवळ पुण्यातच नाही, तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरुनच समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचे दिसून आले आहे.
लहान मुलांना ऐकायला येत नाही, हे पालकांना लवकर कळत नाही. त्यामुळे याविषयी जनजागृती करण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जी मुले आर्थिकदृष्टया दुर्बळ आहेत, त्यांना विनामूल्य श्रवणयंत्र दिले जात आहे. मुलांना ऐकायला येत नसेल तर ती केवळ ऐकू शकत नाहीत, असे नाही तर यामुळे अनेक मुले बोलायला देखील शिकत नाहीत. त्यामुळे याकडे लक्ष देऊन श्रवणयंत्र विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
