Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

आज महायुतीच्या माध्यमातून जे काम होत आहे त्यामुळे नक्कीच यश मिळेल; सुनील तटकरे यांना विश्वास

रायगड : लोकसभेची निवडणूक उद्या जगाच्या पाठीवरचे देशाचे स्थान बळकट करणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या योजना आणि महत्त्वाची काम होत असल्याचे अभिमानाने सांगितले. महायुतीच्या सर्व नेत्यांच्या समक्ष ४५ + जागा घेऊनच राज्यामध्ये महायुती जागा जिंकेल असा निर्धार यावेळी केला. आज महायुतीच्या माध्यमातून जे काम होत आहे त्यामुळे नक्कीच महायुतीला यश मिळेल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी  व्यक्त केला.
आज रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या जाहीर सभेतून असंख्य जनसमुदाय, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. या जाहीर सभेला मंत्री.हसन मुश्रीफ, शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, मंत्री उदयजी सामंत, मंत्री रवींद्रजी चव्हाण तसेच इतर महायुतीचे सर्वच महत्त्वाचे नेते व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, अनंत गीते यांच्यामागे शिवसेना या चार अक्षरांची ताकद नसती तर त्यांचा निकाल तेव्हाच लागला असता. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पाच वर्षे आपल्याला काम करण्याची संधी मिळाली. मात्र आपण गीते यांचे एक काम दाखवा आणि बक्षीस घेऊन जा. एका गोष्टीचे वाईट वाटते, पत्रकार मित्रांनी गीतेंना प्रश्न विचारला ; कोरोना, चक्रीवादळ या संकटात तुम्ही कुठे होता? त्यावेळी ते हसत होते. नैसर्गिक आपत्तीला हसणारा लोकप्रतिनिधी असतो, हे माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदा पाहायला मिळाले.
निवडून आल्यावर मी येणारी पाच वर्षे महायुतीचा खासदार म्हणूनच काम करणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना अनेक वर्षे या मतदारसंघांमध्ये येण्याची वाट पाहत होत्या, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा महायुती सत्तेत आल्यानंतर त्या आणण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचा शब्द तटकरे यांनी यावेळी दिला. काही वेळेला समाजात धर्माच्या नावाने संभ्रम निर्माण केला जातो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये किरकोळ नाही तर मागच्यापेक्षा मोठ्या फरकाने आपल्याला यश मिळेल. पुढची पाच वर्षे जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलं. येणाऱ्या दि. ७ मे ला न चुकता घड्याळावर बटन दाबा आणि प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन यावेळी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading