Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

राज्यस्तरीययुवा शास्त्रीय गायन स्पर्धेत मुंबईचा साहिल भोसले प्रथम


पुणे : कलासक्त कल्चरल फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय युवा शास्त्रीय गायन स्पर्धेत मुंबईच्या साहिल भोसले याने प्रथम क्रमांक पटकाविला. पुण्याचा तनीश अरोरा द्वितीय तर भक्ती पवार तृतीय आली. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे दहा हजार, सात हजार व पाच हजारांचे रोख पारितोषिक तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
पुण्यातील कलासक्त कल्चरल फाउंडेशन संस्थेने युवा गायकांना प्रोत्साहन मिळावे व अभिजात संगीताची परंपरा चालू राहावी यासाठी शास्त्रीय गायनाची स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे यंदाचे पहिले वर्ष आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास 60 स्पर्धक सहभागी झाले होते. प्राथमिक फेरीतून 12 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरी पुण्यातील गोपाल गायन समाज येथे आज (दि. 24) झाली. त्यानंतर पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. पारितोषिक वितरण परीक्षक समितीचे अध्यक्ष व गुरू पंडित विकास कशाळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी कलासक्त कल्चरल फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. विनिता आपटे उपस्थित होत्या. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परिक्षण डॉ. अरुणा चाफेकर, सविता ईनामदार, विणा धामणकर यांनी तर अंतिम फेरीचे परिक्षण पातंजली मादुसकर, अपर्णा गुरव यांनी केले.
स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर सादरीकरण कसे करावे याविषयी मार्गदर्शन करून पंडित विकास कशाळकर म्हणाले, सादरीकरणात आवश्यक भावनिर्मिती होणे आवश्यक असते. तसेच वेळेचे महत्त्व आणि शिस्त जपली जायला हवी. कुठल्याही कलाकाराची नक्कल न करता प्रामाणिकपणे केलेले सादरीकरण नेहमी चांगलेच होते.
पातंजली मादुसकर म्हणाले, शास्त्रीय संगीत हाच संगीताचा पाया आहे. पाया भक्कम असेल तर भविष्यातील वाटचाल सुकर होऊ शकते. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगला मंच उपलब्ध झाला आहे. स्पर्धेच्या मंचावर जो चांगला रंग भरतो तो त्याचा कौतुकाचा सोहळा असतो. इतर कलाकारांचे गाणे ऐकणे हा सुद्धा रियाजच असतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना डॉ. अरुणा चाफेकर यांनी स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचे नियोजन करावे याविषयी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. राग आणि बंदिशींची निवड उत्कृष्ट होती याबद्दल त्यांनी स्पर्धकांचे कौतुक केले.
प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ. विनीता आपटे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत रवींद्र सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading