Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

नीलाद्री कुमार यांच्या सतारीच्या झंकाराने पुणेकर मुग्ध

 

पुणे  : उत्तरोत्तर वाढणारी थंडी आणि सतारीचा झंकार याचा आनंद आज पुणेकर रसिक श्रोत्यांनी घेतला. निमित्त होते १० व्या गानसरस्वती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या समारोप सत्रात संपन्न झालेल्या सुप्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार यांच्या सतार वादनाचे.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.

राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सुरु असलेल्या या महोत्सवाला नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र बिभास आमोणकर, निहार आमोणकर, अजित बेलवलकर, समीर बेलवलकर, अतुल देसाई, अतुल अष्टेकर, मकरंद केळकर, अपर्णा जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात नीलाद्री कुमार यांचे सतारवादन संपन्न झाले. त्यांनी यावेळी राग झिंझोटी प्रस्तुत केला. नीलाद्री यांनी सुरुवातीपासूनच रसिकांच्या मनाची पकड घेत सादरीकरणाला सुरुवात केली. सुयोग्य राग विचार, राग मांडणी आणि सादरीकरण यामुळे त्यांनी सादर केलेल्या सतारीच्या सुरावटीं वातावरणात चैतन्य निर्माण झाले. यावेळी प्रत्येक आवर्तनाला उपस्थित रसिक प्रेक्षकांनी दाद दिली. नीलाद्री कुमार यांना शुभ महाराज यांनी तबल्यावर समर्पक तबलासाथ केली.

या आधी कार्यक्रमात मुंबई येथील ज्येष्ठ तबलावादक पं नाना मुळे व मणिपाल येथील पं रंगा पै यांचा गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

कलाकारांच्या सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार देण्यात येतात. रोख रु. २५ हजार, मानपत्र व मानचिन्ह असे याचे स्वरूप आहे. पंडित रघुनंदन पणशीकर, निहार आणि बिभास आमोणकर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading