Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

सौरभ काडगांवकर आणि आरती अंकलीकर टिकेकर यांच्या गायनाने गानसरस्वती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुमधुर सुरुवात

 

पुणे  : पंडित रघुनंदन पणशीकर यांचे शिष्य व आश्वासक गायक सौरभ काडगांवकर आणि ज्येष्ठ गायिका विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सुमधुर गायनाने आज १० व्या गानसरस्वती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.

राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सुरु असलेल्या या महोत्सवाला नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र बिभास आमोणकर, निहार आमोणकर, अजित बेलवलकर, समीर बेलवलकर, अतुल देसाई, अतुल अष्टेकर, मकरंद केळकर, अपर्णा जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे शिष्य पंडित रघुनंदन पणशीकर यांकडे सौरभ काडगांवकर यांनी संगीताचे शिक्षण घेतले आहे. आज महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सौरभ यांनी राग भीमपलास सादर करीत केली. यामध्ये त्यांनी ‘रे बिरहा…’ हा पारंपरिक ख्याल प्रस्तुत केला. ‘नाद समुद्र कोहे..’ हा मध्यलय तीन तालातील छोटा ख्याल देखील त्यांनी सादर केला. आपले मित्र रोहित मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘मंगल गाओ बजाओ… ‘ या नवीन रागमालेने त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

यानंतर सादर झालेला एक तालातील तराणा आणि किशोरी आमोणकर यांच्या ‘बोलावा विठ्ठला…’ हा अभंग प्रस्तुत करीत त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला). अमोल बिचू (संवादिनी), ओम चव्हाण व अभिषेक ढिले (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

यानंतर विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांनी राग पूर्वा कल्याण ची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी ‘होवन लागी सांझ…’ हा तीन तालातील बडा ख्याल आणि तराणा गायला. पंडित शंकर अभ्यंकर यांची ‘पिहरवा आजा आजा रे…’ ही बंदिशही त्यांनी सादर केली. यानंतर विदुषी आरती अंकलीकर त्यांनी राग हेमंत मध्ये आपले गुरू पंडित दिनकर कायकिणी यांची ‘आओ री आओ री सखी…’ ही बंदिश सादर केली.

त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), अनुराधा मंडलिक व स्वरूपा बर्वे घुले (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

मिलींद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading