Monday, June 1, 2026
BusinessLatest News

‘स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड’ क्षेत्रात ‘महिंद्रा मनुलाइफ’चा प्रवेश; सादर केला ‘एमपॉवर एसआयएफ’

मुंबई : महिंद्रा मनुलाइफ म्युच्युअल फंडने आज ‘एमपॉवर एसआयएफ’ (स्पेशलाईझ्ड इन्व्हेस्टमेंट फंड) सुरू करीत असल्याची घोषणा केली. या फंडाच्या माध्यमातून सेबीने नुकत्याच अधिसूचित केलेल्या ‘स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड’ (एसआयएफ) या नव्या गुंतवणूक उत्पादन विभागात कंपनीने प्रवेश केला आहे. गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर असल्याचे यामधून स्पष्ट होते.

एसआयएफ श्रेणीमध्ये पारंपरिक म्युच्युअल फंडांपेक्षा गुंतवणुकीची वेगळी धोरणे असतात. यामध्ये लाँग-शॉर्ट पद्धती, डेरिव्हेटिव्ह्जवर आधारित धोरणे आणि अधिक केंद्रित पोर्टफोलिओ रचना यांसारखे पर्याय उपलब्ध असतात. गुंतवणुकीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेगळा दृष्टिकोन शोधणाऱ्या गुंतवणूकदारांना हे फंड उपयुक्त ठरू शकतात.

‘एमपॉवर एसआयएफ’च्या माध्यमातून महिंद्रा मनुलाइफ म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यमान म्युच्युअल फंड गुंतवणुकीला पूरक ठरतील आणि डेरिव्हेटिव्ह्जसह विविध साधनांच्या मदतीने वेगळ्या प्रकारचे जोखीम-परतावा पर्याय उपलब्ध होतील, अशा उत्पादनांची मागणी ग्राहकांकडून वाढत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

गुंतवणूकदारांच्या अपेक्षा आणि आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारा अनुभव देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. तसेच सातत्यपूर्ण आणि अर्थपूर्ण गुंतवणुकीची फळे देण्याच्या आपल्या मूलभूत तत्त्वाशी प्रामाणिक राहण्यावरही कंपनीचा भर राहणार आहे.

‘एमपॉवर एसआयएफ’च्या सादरीकरणाबाबत बोलताना ‘महिंद्रा मनुलाइफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अँथनी हेरेडिया म्हणाले, “एमपॉवर एसआयएफ सादर करून आम्ही आमच्या उत्पादन पोर्टफोलिओच्या विस्तारातील एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. गुंतवणूकदारांच्या गरजा, उद्दिष्टे आणि अपेक्षा कालांतराने बदलत असतात. त्यामुळे गुंतवणुकीच्या विविध साधनांचा प्रभावी वापर करून सातत्यपूर्ण परिणाम साध्य करणारे आणि अधिक लवचिकता देणारे पर्याय उपलब्ध असणे आवश्यक आहे. व्यापक अनुभव असलेली गुंतवणूक टीम आणि जोखीम व्यवस्थापनाची मजबूत व्यवस्था यांमुळे हा आमचा दृष्टिकोन अधिक प्रभावी ठरतो.”

यावेळी ‘महिंद्रा मनुलाइफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’चे इक्विटी विभागाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी कृष्णा संघवी म्हणाले, “एमपॉवर एसआयएफमुळे अधिक व्यापक गुंतवणूक साधनांचा वापर करून लवचिक आणि उद्दिष्टकेंद्रित पोर्टफोलिओ तयार करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळते. या फंडाच्या माध्यमातून मूलभूत संशोधन आणि परिस्थितीनुसार गुंतवणुकीचे वाटप करणारे धोरण यांची सांगड घालता येईल. बाजाराच्या विविध चक्रांमधील जोखीम लक्षात घेऊन अधिक चांगला परतावा मिळवणे, हे या एसआयएफचे उद्दिष्ट आहे. पोर्टफोलिओ उभारणीसाठी अधिक विचारपूर्वक आणि विविधांगी दृष्टिकोन शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरेल, असा आमचा विश्वास आहे.”

गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजा आणि नियामक संस्थांची मार्गदर्शक तत्त्वे यांचा विचार करून, ‘एमपॉवर एसआयएफ’द्वारे इक्विटी, हायब्रिड आणि फिक्स्ड इन्कम विभागांमध्ये गुंतवणुकीचे विविध पर्याय आणण्याचे ‘महिंद्रा मनुलाइफ म्युच्युअल फंडा’चे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading