Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

‘उगम’ कार्यक्रमात हार्मोनियम आणि विविध संगीतप्रकारांचा अनोखा संगम

पुणे  : हार्मोनियम वादक, गायक आणि संगीतकार तन्मय देवचके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘उगम’ या वैशिष्ट्यपूर्ण संगीत कार्यक्रमाचे यंदा पाचवे वर्ष साजरे होत आहे. हा कार्यक्रम येत्या ७ जून रोजी, रविवारी, पुण्यातील मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रम दोन सत्रांमध्ये होणार असून पहिल्या सत्रात सकाळी ९:३० वाजता  ‘स्वरानुजा’च्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण होईल. तर दुसऱ्या सत्रात संध्याकाळी ५:३० वाजता तन्मय देवचके यांचा ‘तन्मय इन हार्मनी’ हा अनोखा प्रयोग रसिकांना अनुभवता येणार आहे. या सादरीकरणात त्यांच्या स्वतःच्या रचनांचा समावेश असणार आहे. दोन्ही कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे.

यंदाच्या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे ‘हार्मोनियम रायता’ ही विशेष रचना. भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य हिपहॉप संगीताचा संगम असलेली ही अनोखी रचना तब्बल १५ हार्मोनियमवादक एकाच वेळी जुगलबंदी स्वरूपात सादर करणार आहेत. यासोबतच जुन्या संतांच्या अभंगांना तन्मय देवचके यांनी नव्याने दिलेल्या चाली रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. तसेच कवी भूषण यांच्या ‘इंद्रजिमी जंभपर’ या प्रसिद्ध छंदाला तन्मय देवचके यांनी दिलेली नवी चाल, जी सोशल मीडियावर विशेष गाजली, तीही ‘उगम’मध्ये सादर केली जाणार आहे.

कार्यक्रमाची आणखी एक खास बाब म्हणजे दरवर्षी अनेक मान्यवर कलाकार ‘उगम’ला उपस्थित राहतात. यंदा सुप्रसिद्ध गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच दरवर्षी दिली जाणारी ‘श्री गोपाळराव देवचके शिष्यवृत्ती’ यंदा त्यांच्या हस्ते एका विद्यार्थ्याला प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला सोहम गोराणे, अनिश थत्ते (तबला), रोहित खवले (पखवाज), तन्मय पवार (इलेक्ट्रिक गिटार), श्रेयस कडकोळ (बेस गिटार), अभिषेक भुरुक (ड्रम्स), जय सूर्यवंशी (कीबोर्ड) आणि मुक्ता जोशी-वैद्य (गायन) साथसंगत करणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading