Tuesday, June 2, 2026
Latest NewsMAHARASHTRA

भिक्खुंनी गावोगावी फिरून धम्म प्रसार करावा -डॉ. भिमराव य. आंबेडकर

मुंबई : तथागत भगवान बुध्दाच्या सद्धम्माचा प्रचार प्रसार भिक्खुंनी गावोगावी फिरून लोकांत जाऊन करावा, भिक्खुंच्या आजारपणात त्यांच्या निवासाची व औषधोपचाराची सोय, भारतीय बौद्ध महासभा करणार असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव य. आंबेडकर (ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी डॉ आंबेडकर भवन, दादर पूर्व, मुंबई येथे दि बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने बौद्ध महासभा व संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या एकदिवशीय कार्यशाळेत केले.

या वेळी संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया यांची प्रमुख उपस्थित होती. या कार्यशाळेत भन्ते बी.संघपालजी महाथेरो (बौद्ध महासभा भिक्खु संघ प्रमुख ), भन्ते महाविरो थेरो (बौद्ध महासभा भिक्खु संघ उप्रमुख ), एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख ), डॉ‌. अॅड. एस एस वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ) यांनी भिक्खुंची आचारसंहिता, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान कशी करावी अर्थात बी एस आय मिशन आणि भिक्खु संघाची आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर शंका समाधान,भिक्खु आणि केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा संस्कार विधी व शिबीर समन्वय इत्यादी बाबत सविस्तर चर्चा होऊन एकमताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी धम्मकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्रिपिटक, बुद्ध आणि त्यांचा धम्म,भिक्खु विनय, बौद्ध संस्कार विधी व भिक्खु इत्यादीबाबत चर्चा झाली.एकमत न झालेल्या काही मुद्दयावर समिती स्थापन करून पुढे निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले.भिक्खु प्रशिक्षित होण्यासाठी 10 दिवसाचे केंद्रीय शिक्षक शिबीराचे आणि भिक्खु आणि वरिष्ठ पदाधिकारी यांचे सात दिवसाचे चिवर वरील विशेष शिबीराचे आयोजन करण्याचे ठरविले.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. अॅड. एस. एस. वानखडे यांनी केले. या महत्वपूर्ण कार्यशाळेस बौद्ध महासभा भिक्खु संघांचे महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश येथील भिक्खु- भिक्खुनी आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे केंद्रीय, प्रशिक्षण विभाग, माहिला विभाग, महाराष्ट्र व मुंबई प्रदेश मधील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई व अॅड. एस. एस. वानखडे यांना मेक्सिको येथील तोलोसा विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सोशल वर्क ही मानद पदवी प्रदान केल्याबद्दल डॉ. भीमराव य. आंबेडकर, डॉ. हरीश रावलिया, एस. के.भंडारे यांनी त्यांचा सत्कार केला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading