Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

पं विश्व मोहन भट्ट यांना यावर्षीचा ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ जाहीर

पुणे : नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार या वर्षी ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण पं विश्व मोहन भट्ट यांना जाहीर झाला आहे. याबरोबरच मुंबई येथील ज्येष्ठ तबलावादक पं नाना मुळे व मणिपाल येथील पं रंगा पै यांचा गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्काराने सन्मान होणार असल्याची माहिती नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं रघुनंदन पणशीकर यांनी दिली. यासोबतच यावर्षीचा बेलवलकर गृप प्रस्तुत गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार कर्नाटकी गिटारवादक अभय नायमपल्ली, व्हायोलिनवादक मानस कुमार, आणि तबलावादक ईशान घोष यांना जाहीर झाला आहे.

पुरस्काराचे हे आठवे वर्ष असून येत्या २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान कर्वेनगर येथील राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स या ठिकाणी १० वा गानसरस्वती महोत्सव संपन्न होणार आहे. त्यावेळी महोत्सवात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

कलाकारांच्या सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार देण्यात येतात. रु. ५१ हजार व मानपत्र असे गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्काराचे तर रु. २५ हजार व मानपत्र असे गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्काराचे स्वरूप आहे.

आश्वासक युवा कलाकारांकरिता संस्थापित केलेल्या बेलवलकर ग्रुप प्रस्तुत गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्काराचे स्वरूप रु. १५ हजार व मानचिन्ह असे असेल अशी माहितीही पं रघुनंदन पणशीकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading