शिवसृष्टीचे काम वेगाने पूर्ण होण्याच्या दृष्टीने दिल्लीमधून आवश्यक ते सहाय्य करणार – खासदार डॉ. मेधा कुलकर्णी
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर यावा या उद्देशाने न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचे काम वेगाने पूर्ण होण्याच्या दृष्टीने दिल्लीमधून आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे आश्वासन पुण्याच्या राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांनी आज दिले.
पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने साकारत असलेल्या शिवसृष्टीला डॉ कुलकर्णी यांनी आज शिवजयंती निमित्त भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
डॉ मेधा कुलकर्णी यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करीत त्यांना अभिवादन केले. शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड एस के जैन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आबा रावत, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, सुनील मुतालिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या “शिवसृष्टीसारखा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा या दृष्टीने आवश्यक ती सर्व मदत करण्यास मी कटिबद्ध आहे. याबरोबरच पुण्यातील शिक्षण संस्थांना येणाऱ्या अडीअडचणीदेखील दूर करण्याचा प्रयत्न मी करेल.” विनीत कुबेर यांनी यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
