Monday, June 1, 2026
Latest NewsMAHARASHTRA

सर्वसामान्यांना वेळेत आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून द्या – मंत्री छगन भुजबळ

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. कोणतीही गरजू व्यक्ती औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

येवला उपजिल्हा रुग्णालय येथे क्रस्ना डायग्नोस्टिक यांच्या सी.टी.स्कॅन मशीनचे लोकार्पण मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. शैलजा कुप्पास्वामी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. संदीप सुर्यवंशी, क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या कार्यकारी व्यवस्थापक पल्लवी जैन, निर्मळ संचेती यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, आज लोकार्पण झालेल्या सुमारे साडेचार कोटींच्या सी. टी. स्कॅन मशीनमुळे अनेक दुर्धर आजारांचे निदान होण्यास मदत होणार आहे. अतिगंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यकता भासल्यास खासगी विशेषज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. या उपजिल्हा रुग्णालयात अतिशय उत्तम व आधुनिक पद्धतीचा अतिदक्षता विभाग असून नव्याने 20 खाटाचे ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यास देखील मान्यता मिळाली आहे. याचप्रमाणे या रुग्णालयात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासाच्या व्यवस्थेसाठी 15 कोटींच्या नवीन निवासस्थान इमारतीला मान्यता प्राप्त झाली आहे. या कामांना लवकरच सुरवात होणार आहे.

प्रारंभी भुजबळ यांनी उपजिल्हा रुग्णालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची पाहणी केली. यावेळी येवला उपजिल्हा रुग्णालय येथे भुजबळ यांच्या हस्ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून सिटीस्कॅन मशीनचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. शैलजा कुप्पास्वामी यांनी सांगितले, या सी.टी. स्कॅन मशीनचे काम हे क्रस्ना डायग्नोस्टिक्स यांच्याकडे सात वर्षांसाठी देण्यात आले आहे. यामध्ये शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे. तर बाहेरील रुग्णांसाठी माफक दरात सी. टी. स्कॅनची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading