Friday, September 18, 2026
Latest NewsPUNE

लहान मुले आणि गरजूंची सेवा हीच गणरायाची भक्ती व सेवा – अनुराधा पौडवाल

पुणे : आपण समाजासाठी चांगली कामे सुरु केली, की समविचारी लोक आपल्याला जोडले जातात. कोविड काळात सर्व काही बंद असताना समाजासाठी काहीतरी करायचे आहे, पण करता येत नाही, या भावनेने मी अधिक अवस्थ झाले. मात्र, त्यानंतर लहान मुले आणि गरजूंची सेवा हीच खरी गणरायाची भक्ती व सेवा आहे, या भावनेतून कामाला सुरुवात केली. ज्यांना श्रवणदोष आहे, अशांना ‘आवाजाची अनोखी भेट’ देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची भावना प्रख्यात गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाऊंडेशन, मुंबई व माय होम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तब्बल १५७ ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्र मोल्ड चे वाटप करण्यात आले. यावेळी माय होम इंडियाचे सुनील देवधर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ऑस्ट्रेलियातून कार्यक्रमासाठी आलेले नितीन भोगले, आरती भोगले आदी उपस्थित होते. सूर्योदय फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल याविषयी सातत्याने जनजागृती करीत आहेत.

सुनील देवधर म्हणाले, एखाद्या अवयवाची क्षमता कमी असली, तरी देखील परमेश्वर त्या व्यक्तिला दुसरे सामर्थ्य देत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रात अशी अनेक यशस्वी दिव्यांग व्यक्तिंची उदाहरणे आपल्याला बघायला मिळतील. परंतु गरजू दिव्यांगांना सक्षम करण्याचे अनोखे काम या श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमातून केले जात आहे. आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून ज्येष्ठ नागरिकांना हे यंत्र देण्यात आले असून दगडूशेठ गणपती ट्रस्टचे सामजिक कार्य आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, मोफत श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमाचा हा ४ था टप्पा आहे. केवळ पुण्यातच नाही, तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरुनच समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचे दिसून आले आहे. जी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्टया दुर्बळ आहेत, त्यांना विनामूल्य श्रवणयंत्र दिले जात असून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. राजाभाऊ घोडके यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading