ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद
पुणे : ग्राहकांना थेट उत्पादक किंवा शेतकर्यांकडून रास्त दरात तांदूळ उपलब्ध करून देण्यासाठी ३३ वर्षांपूर्वी ग्राहक पेठेने तांदूळ महोत्सव ही कल्पना प्रत्यक्षात आणली. बाजारामध्ये दर वाढल्यानंतर देखील सर्व तांदूळ दिनांक १२ जानेवारीला जे दर होते, त्याच दरांमध्ये याही वर्षी दि.१८ फेब्रुवारीपर्यंत तांदूळ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. खजिना विहीर चौकातील ग्राहक पेठ तांदूळ महोत्सव येथे हा उपक्रम सुरु आहे, अशी माहिती ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी दिली.
या तांदूळ महोत्सवामध्ये कोहिनूर व जयराज कंपनीचे बासमती, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, माध्यप्रदेश येथील आंबेमोहोर, कोलम, इंद्रायणी त्याच प्रमाणे बासमती मधील तिबार, दुबार, मोगरा, मिनि मोगरा असे प्रकार उपलब्ध करून दिले असून डुप्लिकेट बासमतीची ग्राहकांना माहिती असावी याकरिता, ती माहिती देखील ग्राहकांना दिली जात आहे. या महोत्सवाला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
या तांदूळ महोत्सवाची सुरूवात भगिनी निवेदिता बँकेच्या अध्यक्षा रेवती पैठणकरांच्या हस्ते झाली. दरवर्षी नामवंत महिलांच्या हस्ते महोत्सवाची सुरूवात करण्यात येते. आजपर्यंत महोत्सवास लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, खासदार वंदना चव्हाण, माजी महापौर व आमदार कै.मुक्ता टिळक, प्रसिद्ध साहित्यिका कै.शांता शेळके, अरुणा ढेरे, सुमन किर्लोस्कर, सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे, अनुराधा मराठे यांचा समावेश आहे. या तांदुळ महोत्सवास या वर्षी रायबरेलीचे जिल्हाधिकारी डॉ.आर. के. कनोजिया, वर्ल्ड बँक सदस्या डॉ.अंजली पारसनीस यांनी भेट दिली.
या वर्षीच्या महोत्सवाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तर प्रदेश मधील रायबरेली जिल्ह्यातील किसान प्रोड्यूसर कंपनीने तेथील प्रसिद्ध असे रामभोग, शक्कचिनी, सोनम, मोती, श्रीराम इ. तांदुळाचे प्रकार ग्राहकांना एक सप्ताह उपलब्ध करून दिले आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमधील या तांदुळाच्या व्हरायटी मोठ्या प्रमाणात रास्त दरात ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तांदूळ महोत्सव एक महिनाभर चालू असून आतापर्यंत १.२५ कोटी रूपयांहून अधिक विक्री झाली आहे.
