‘डेक्कन जिमखाना करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेचे १२ फेब्रुवारी पासून आयोजन !!
पुणे : पुण्यातील मानांकित आणि सर्वात जुन्या क्लबपैकी असलेल्या डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने ‘डेक्कन जिमखाना करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत डेक्कन जिमखाना क्लबच्या आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि डेक्कन जिमखाना क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव मृगांक राठी यांनी सांगितले की, २०२४ या नवीन वर्षामध्ये क्लब स्तरावरील खेळाडूंना गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळावी तसेच व्यावसायिक खेळाचा सराव व्हावा, या उद्देशाने या आंतर-क्लब क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये ८ निमंत्रित संघांचा समावेश असून महाराष्ट्रातील अनेक युवा गुणवान खेळाडू तसेच रणजीपटू खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होताना दिसणार आहेत.
स्पर्धेत यजमान डेक्कन जिमखाना अ आणि ब संघ, पुनित बालन केदार जाधव अॅकॅडमी, आर्यन्स् क्रिकेट क्लब, पीवायसी हिंदू जिमखाना, पुना क्लब, दिलीप वेंसरकर क्रिकेट अॅकॅडमी आणि क्लब ऑफ महाराष्ट्र हे संघ विजेतेपदासाठी झुंझणार आहेत, असे श्री. मृगांक राठी यांनी सांगितले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निमंत्रित स्पर्धेत सहभागी झालेले आणि एलिट ग्रुपमध्ये असणारे हे सर्व क्लब या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. यामुळे या स्पर्धेमध्ये विजेतेपदासाठी चुरस दिसणार आहे.
स्पर्धेचे सामने साखळी आणि बाद फेरीमध्ये खेळवण्यात येणार आहेत. सहभागी ८ संघ चार-चार अशा दोन गटांमध्ये विभागले गेले असून साखळी फेरीत अव्वल कामगिरी करणारे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेचे सामने व्हाईट चेंडूवर होणार असून प्रत्येक सामना २०-२० षटकांचा असणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक देण्यात येणार आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी पारितोषिके देण्यात येणार असून प्रत्येक सामन्याचा सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल स्पर्धेत असणार आहे.
स्पर्धेचे उद्धघाटन क्लब मध्ये अनेक वर्षांपासून ग्राउंड्समन म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते होणार असून उद्धघाटनाचा सामना पीवायसी हिंदू जिमखाना आणि दिलीप वेंसरकर क्रिकेट अॅकॅडमी यांच्यामध्ये होणार आहे.
