Tuesday, June 2, 2026
Latest NewsPUNE

पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांना स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार जाहीर…

पुणे : राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल २०२४ चा ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा स्व. धारिया यांच्या जयंतीदिनी, बुधवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.४५ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होईल. तो सर्वांसाठी खुला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाशजी मिश्रा सन्माननीय अतिथी आहेत. वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी आज पुरस्काराची घोषणा केली.
यंदा डॉ. मोहन धारिया यांची ९९वी जयंती असून पुढील वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे ‘जन्मशताब्दी वर्ष’ साजरे केले जाणार आहे.

आपल्या विशिष्ट कार्यक्षेत्रातून भारताच्या विकासात मुलभूत योगदान देणाऱ्या समाजातील जेष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ देण्यात येतो. आजपर्यंत या पुरस्काराने डॉ. रघुनाथ माशेलकर (२०१४), अण्णा हजारे (२०१५), डॉ. जयंत नारळीकर (२०१६), डॉ. मनमोहन सिंग (२०१७), डॉ. एम. एस. स्वामीनाथन (२०१८),  डॉ. अनिल काकोडकर (२०१९), डॉ. कस्तुरीरंगन (२०२०), डॉ. ई. श्रीधरन (२०२१), डॉ. माधव गाडगीळ (२०२२), केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (२०२३) यांना गौरवण्यात आले आहे. एक लक्ष रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ व मानचिन्ह असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराची संकल्पना ‘वनराई’चे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांची असून, त्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून अव्याहतपणे सुरु आहे.

यावर्षीचा पुरस्कार लशीकरणाच्या क्षेत्रातील अद्वितीय योगदानाबद्दल डॉ. सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात येईल. लशीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेत ‘वनराई फाउंडेशन’ने डॉ. सायरस पूनावाला यांची स्व.डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कारासाठी एकमताने निवड केली असल्याची माहिती रवींद्र धारिया यांनी दिली.

धारिया म्हणाले की, डॉ. पूनावाला यांनी “परवडणाऱ्या लशीतून सर्वांसाठी आरोग्य” हे ब्रीद नजरेसमोर ठेऊन १९६६ मध्ये ‘सिरम इन्स्टिट्यूट’ ची स्थापना केली आणि याद्वारे विविध आजारांवर उपाय ठरणाऱ्या जीवरक्षक लशींचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. रोगप्रतिबंधक लशीद्वारे जगभरातील ३० दशलक्षांहून अधिक मानवी जीव वाचवणारी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून आज सिरम इन्स्टिट्यूट ओळखली जाते. ‘कोविड’ महामारीमध्ये ‘सिरम’ ने विकसित केलेली लस भारतासह अनेक देशांसाठी वरदान ठरली. डॉ. पूनावाला यांच्या या प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात येत असल्याचा विशेष आनंद होत आहे.

वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, डॉ. गिरीश गांधी, नितीनभाई देसाई, रोहिदास मोरे, गणपतराव पाटील,  सागर धारिया, सचिव अमित वाडेकर, समीर सराफ, अनंत घारड, डॉ.पिनाक दंदे, अजय पाटील, निलेश खांडेकर, अनिल राठी, अॅड्. निशांत गांधी व समस्त वनराई परिवार पुरस्कार सोहळ्यास उपस्थित असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading