गांधीजींचा विचार आता काही शिल्लक राहिलेला नाही – अॅड. गुणरत्न सदावर्ते
नागपूर : सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा बरळले असून गांधीजींवर टीका करत त्यांनी नथुराम गोडसेचे गुणगान गायले आहे. यवतमध्ये एसटी बँकेच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, ज्या प्रकारे शरद पवारांच्या विचारांना झोडपून काढले, तसेच त्यांच्या बगलबच्च्यांना झोडपून हाकलून लावले आहे. अखंड भारताचे भाग्यविधाते नथुरामजी गोडसे यांची भूमिका प्रत्येक हिंदू काळजात ठेवून आहे. गांधीजींचा विचार आता काही शिल्लक राहिलेला नाही. अखंड भारताचा विचार शिल्लक आहे. पाकिस्तानधार्जिणा विचार शिल्लक नाही. म्हणून असे विचार काँग्रेस कधीही संपवू शकणार नाही. शरद पवारांचा विचार सुद्धा गोडसे यांच्या पायाच्या धुळीइतका सुद्धा नाही, असे वादग्रस्त विधान सदावर्तेंनी केले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात उडी घेतली आहे. वेगळ्या विदर्भासाठी आपण आंदोलन उभारणार असल्याचे सांगत त्यांनी नागपूर कराराची होळी केली. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या भूमिकेवरही टीका केली. ते म्हणाले की, वेगळ्या विदर्भाची मागणी अनेक वर्षांपासून आहे. आता मात्र वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही, असा निश्चय गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. वेगळ्या विदर्भाच्या आड याल तर या भूमीत तुम्हाला पाय ठेवू देणार नाही असा इशारा सदावर्तेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
