Sunday, July 26, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यात होणार “महाराष्ट्र अमृत कलश संकलन”, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची उपस्थिती

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरातून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात आले. यानिमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) महाराष्ट्र, आणि नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या वतीने हजारो विद्यार्थ्यांमार्फत महाराष्ट्रात राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत राज्यभरातील २२ विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या अमृत कलशाचे एकत्रीकरण २६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय मंत्री, खासदार राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डाजी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच महाराष्ट्रातील २२ विद्यापीठांचे कुलगुरू आणि प्रतिनिधी उपस्थित असतील.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी यांनी देशातील शूरवीरांचा गौरव करण्यासाठी आणि शहिदांना आणि हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाची घोषणा केली. साऱ्या देशाला कृतज्ञतेच्या आणि एकात्मतेच्या भावनेने जोडणारे हे अभियान आहे. याअंतर्गत गावागावांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये अमृतवाटिका तयार करण्यात येत आहेत, शिलालेख लावण्यात येत आहेत. या अभियाना अंतर्गत हजारो हातांनी गोळा केलेली माती प्रतीकात्मक स्वरूपात अमृत कलशामधून जमा करण्यात येत आहे.

राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र यांच्यावतीने राज्यातील महाविद्यालयांमधील उपक्रमातून जमा झालेले अमृतकलश प्रातिनिधिक स्वरूपात माजी केंद्रीय मंत्री खासदार. जे. पी. नड्डाजी यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात येत आहे. येत्याकाळात देशभरातून येणारे अमृत कलश दिल्लीमध्ये एकत्रित करण्यात येतील आणि त्यातून देशाच्या एकात्मतेचे प्रतीक असलेली अद्वितीय अमृतवाटिका उभी राहणार आहे.

कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, शिवाजीनगर पुणे येथील मुख्य सभागृहात २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता ‘महाराष्ट्र अमृत कलश संकलन’ हा सोहळा होणार आहे. खासदार जे. पी. नड्डा जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री माननीय श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील नामांकित शिक्षण संस्थांचे प्रमुख आणि राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू अमृत कलशांसह सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोबत महाराष्ट्रातील २२ विद्यापीठातून विद्यार्थ्यांनी आणलेल्या अमृतकलशांची मिरवणूक काढत सन्मानपूर्वक त्यांचे हस्तांतर सन्माननीय पाहुण्यांकडे करण्यात येणार आहे.

याशिवाय आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती, पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी हे देखील राबवलेल्या अभियानाचे अमृतकलश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सुपूर्त करतील. यानिमित्ताने माननीय जे पी नड्डा यांचे मार्गदर्शन होईल. तसेच पुणेकर नागरिकांपर्यंत अभियान नेण्यासाठी शहर भाजपतर्फे एकाच दिवसात घरोघरी जाऊन ३८००० कुटुंबांकडून अमृतकलशात माती गोळा करण्यात आली होती. पुणेकरांच्या वतीने आलेला हा अमृतकलशही यावेळी मान्यवरांकडे सपूर्त करण्यात येईल.

“मेरी माटी, मेरा देश” उपक्रमामध्ये महाराष्ट्राने अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला आहे. शहिदांप्रती कृतज्ञता आणि एकात्मतेचा राष्ट्रव्यापी संदेश देणारे हे अभियान गावागावांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण करीत आहे. राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र आणि नेहरू युवा केंद्र संघटन यांच्यावतीने पुण्यात होणाऱ्या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार तथा मेरी माटी मेरा देश अभियानाचे प्रदेश संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.


भावी पिढीला आपल्या देशाचा, आपल्या शहीदांचा जाज्वल्य इतिहास कळण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांद्वारे आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि नेहरू युवा केंद्र संघटन यांच्यावतीने “मेरी माटी मेरा देश” अभियान राबविण्यात आले. यामध्ये आतापर्यंत राज्यभरातील २२ विद्यापीठांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यात १५१७ महाविद्यालयांनी ४१७६ गावांतून ३४१४ अमृत कलश गोळा केले आहेत. तर, विविध ठिकाणी ११६४ अमृत वाटिका आणि ७८७ शिलफलक स्थापित केले आहेत. शाळा, कॉलेज, गावे, स्मारके अशा ३३४४ ठिकाणी नागरिकांना पंचप्रण ची शपथ विद्यार्थ्यांमार्फत देण्यात आलेली आहे. या अभियानाचा विश्वविक्रम व्हावा यासाठी ‘सेल्फी विथ मेरी माटी’ हा उपक्रम देखील एनएसएस द्वारे राबवला गेला. यात ५७०८८ लोकांनी आपला माती सोबतच सेल्फी आपलोड करून अभियानात भाग घेतला आहे. अजूनही यात लोकांचा सहभाग वाढतच आहे.

राजेश पांडे
राज्य सल्लागार, एनएसएस
(प्रदेश संयोजक, मेरी माटी मेरा देश)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading