पराभवाच्या भीतीने मोदी लोकसभा निवडणूक मुदतपूर्व घेतील – पृथ्वीराज चव्हाण
सातारा : पराभवाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणूक मुदतपूर्व घेतील, असे भाकित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या वतीने सध्या राज्यात जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली आहे. यानिमित्त चव्हाण यांची कराड तालुक्यातील शेरे येथे जाहीर सभा आयोजित केली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
देशात समानता आणि मानवता ही मूल्ये होती. तीच तोडण्याचा आरएसएसचा डाव असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ चेहरा असले तरी त्यांच्यामागे त्यांचा बोलवता धनी आरएसएस असल्याचे देखील त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात वर्षभरात अनेक स्थित्यंतरे होतील. पुढील काही महिन्यांतच लोकसभेच्या निवडणुकाही आहेत. तरी केंद्रातील मोदी सरकार विरोधी पक्षांना बेसावध ठेवून मुदतीआधीच निवडणुका घेण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात हुकूमशाही आणायची आहे. त्यामुळेच ते ‘एक देश एक निवडणूक’ ही पद्धत आणतील, असा आरोप देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीच्या दिशेनेच चालू असल्याचा आरोपही त्यांनी केला. नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान आपणच व्हावे, असे वाटते. त्यामुळेच ते हे सर्व करत असल्याचे ते म्हणाले.
मी मंत्री असेल तरच विकास होईल, असे काही नेते सांगतात. पण विकास समाजाचा की, स्वत:चा करायचा? तुरुंगातून बाहेर यायचे होते का? असा सवाल त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता विचारला. राज्यातील विश्वासघाती सत्तेला जनता कधीही आशीर्वाद देणार नसल्याचेही देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. खोकी घेऊन सरकार पाडले. पण आता तुम्ही निवडणुका घ्या. जनता तुम्हाला जागा दाखवेल, असा इशारा चव्हाण यांनी दिला.