अमराठी भाषिकांना जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न; राज ठाकरेंचा आरोप
मुंबई : मराठी शिकण्याच्या मुद्द्यावरून अमराठी भाषिकांकडून जाणीवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्ये करून घेतली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मराठी माणसाला प्रतिक्रिया देण्यास भाग पाडून त्याला वादात अडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.
“हे मराठी लोक काय उखडतील? आम्ही मराठी बोलणार नाही,” अशी वक्तव्ये मुद्दामहून करायला लावली जात असल्याचे ठाकरे म्हणाले. अशा वक्तव्यांना मराठी समाजाने अनावश्यक महत्त्व देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
नवी मुंबईतील आगामी हिंदी राजभाषा संमेलनाचाही त्यांनी उल्लेख केला. वाशी येथे १४ आणि १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
या संमेलनावरून महाराष्ट्रात हिंदी संमेलन होत असल्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. मात्र, “हे संमेलन होऊ द्या आणि त्या विषयाकडे दुर्लक्ष करा,” असे राज ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी अमित शाह यांच्यावरही त्यांनी मिश्कील टोला लगावला. हिंदी संमेलनाला उपस्थित राहिल्यानेही अमित शाह यांचे हिंदी सुधारू शकत नाही, असे म्हणत त्यांनी शाह यांच्या भाषिक उच्चारांवरून उपरोधिक टिप्पणी केली.
मराठी-अमराठी भाषेच्या मुद्द्यावर राज्यात वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाषिक राजकारणाला धार येण्याची शक्यता आहे.
