Sunday, September 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही उपचारादरम्यान मृत्यू


धाराशिव  : नळदुर्ग किल्ल्यावरून आपल्या तीन मुलांसह उडी घेत जीवन संपवलेल्या राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या कुटुंबावर आणखी एक दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेली त्यांची अडीच वर्षांची मुलगी वीरा हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या चार झाली आहे.

काही दिवसांपूर्वी अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरील उपळी बुर्जावरून सुमारे १०० फूट खोल दरीत उडी घेतल्याची घटना घडली होती. या घटनेत अश्विनी आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर अश्विनी, अजिंक्य आणि क्रांती यांच्यावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, गंभीर जखमी झालेली जुळ्या मुलींमधील दुसरी मुलगी वीरा हिच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिचीही प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे पौळ कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
अश्विनी पौळ या राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होत्या. त्यांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली होती. त्यांच्या पती मनोहर हे देखील कुस्तीपटू असून ते पोलीस भरतीची तयारी करत असल्याची माहिती आहे.

अश्विनी यांना गेल्या काही वर्षांपासून सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या कथित जाचाला कंटाळून त्या मागील तीन महिन्यांपासून माहेरी राहत होत्या. त्यांच्या वडिलांनी मुलीने सासरच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे.

घटनेपूर्वी अश्विनी आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर आल्या होत्या. त्यांच्यासोबत केक असल्याचे सांगण्यात येते. किल्ल्यावर केक कापण्यास सुरक्षा रक्षकाने आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी प्रवेशद्वाराजवळच मुलांसोबत केक कापला आणि त्यानंतर त्या मुलांना घेऊन किल्ल्यावर गेल्या. पुढे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading