गणेशोत्सवात दंगली घडवण्याचा डाव असल्याचा राज ठाकरेंचा गंभीर आरोप; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
ठाणे : गणेशोत्सवाच्या काळात जाणीवपूर्वक जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केला. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी दंगली घडवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका करत देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
गणेशोत्सव 14 सप्टेंबरपासून सुरू होत असून, याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावर विविध मुद्द्यांवरून वातावरण तापवले जात असल्याचे सांगत, आगामी काळात काही जणांकडून जाणीवपूर्वक तणाव निर्माण केला जाऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
“गणपतीच्या दिवसांत दंगली घडवल्या जातील, अशी मला सर्वाधिक भीती वाटते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील विविध भागांत अशा घटना घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. लोकांनी त्यात अडकून पडावे आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष व्हावे, हा त्यामागचा उद्देश असू शकतो,” असे ठाकरे म्हणाले.
मुंबईत नुकत्याच घडलेल्या काही घटनांचा संदर्भ देत त्यांनी त्या मोठ्या कटाची सुरुवात असू शकतात, असा दावा केला. हिंदू आणि मुस्लिम समाजातील सुजाण नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवा, चिथावणी किंवा संघर्षाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
आपल्या नावाने किंवा दुसऱ्या समाजाच्या नावाने काही व्यक्तींना या संघर्षात उतरवले जाऊ शकते आणि त्यातून निरपराध तरुणांचे जीव जाण्याची शक्यता आहे, असा इशारा ठाकरे यांनी दिला. समाजात परस्पर द्वेष निर्माण करून नागरिकांना त्यात गुंतवून ठेवणे आणि देशासमोरील मूळ प्रश्नांपासून त्यांचे लक्ष हटवणे, असा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
