कॅनडाच्या उच्चायुक्तांना ५ दिवसांत ‘भारत’ सोडण्याचे आदेश
नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे. हे आरोप करत कॅनडाने एका भारतीय राजनयिकाला निष्कासित केले आहे. आता भारतानेही मोठे पाऊल उचलले असून कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके यांना ५ दिवसांत भारत सोडण्यास सांगितले आहे. तत्पूर्वी, भारत सरकारने कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप ‘पूर्णपणे फेटाळले’ आहेत. तसेच भारत सरकारने सांगितले की, त्यांच्या राजकीय व्यक्तींनी ‘अशा घटकां’बद्दल उघडपणे सहानुभूती व्यक्त करणे ही गंभीर चिंतेची बाब आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले की, भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली आहे. कॅनडाच्या उच्चायुक्तांना मंगळवारी बोलावून भारत सरकारच्या या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. संबंधित उच्चायुक्तांना पुढील पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. हा निर्णय कॅनडाच्या मुत्सद्यांचा आमच्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांच्या सहभागाबद्दल भारत सरकारची वाढती चिंता प्रतिबिंबित करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रतिबंधित खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची १८ जून रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथे दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. “कॅनडियन नागरिक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या एजंटचा सहभाग असल्याच्या गंभीर आरोपांची कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी सक्रियपणे चौकशी करत आहेत.
जस्टिन ट्रुडो यांनी सोमवारी कॅनडाच्या संसदेत सांगितले, कॅनडियन एजन्सींनी सांगितले आहे की, निज्जरच्या हत्येमागे भारत सरकार असू शकते. आपल्या देशाच्या भूमीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमागे परदेशी सरकार असू शकते. दुसऱ्या देशाचे कॅनडात अस्तित्व अस्वीकार्य आहे आणि हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे.
कॅनडा हा भारताचा हितचिंतक आहे आणि भारत हा कॅनडाचा हितचिंतक राहिला आहे. काहीवेळा खलिस्तानी मुद्द्यावरून मतभेद होत होते, पण असे असूनही दोन्ही देशांमधील संबंध खूप चांगले आहेत, त्यामुळे ही पावले आश्चर्यकारक आहेत.