Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

राज्याच्या आर्थिक विकासामध्ये सूक्ष्म, लघु उद्योगाचे योगदान मोठे


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांचे मत

पुणे : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये सूक्ष्म आणि लघुउदयोगाचे योगदान मोठे राहिलेले आहे. लघू उद्योग हे अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या पाठबळाखेरीज मोठे प्रकल्प पूर्ण होऊ शकत नसल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. लघु उदयॊग भारती महाराष्ट्र प्रदेश यांच्यातर्फे “महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या ध्येयात  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची भूमिका” या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लघु उदयॊग भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित घैसास यांनी धवसे यांच्याशी संवाद साधला.
सदर कार्यक्रम पुणे स्टेशन जवळ असलेल्या हॉटेल शेरेटन ग्रँड येथे संपन्न झाला. यावेळी पुणे, सातारा, सांगली, ठाणे. नवी मुंबई व छत्रपती संभाजी नगर याठिकाणी कार्यरत असलेले ७० हून अधिक उद्योजक उपस्थित होते. 

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे राज्याच्या आर्थिक विकासामध्ये हा सर्वात महत्वाचा सक्रिय भूमिका बजावणारा घटक आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढतो आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला पाठबळ देण्याचा सरकारचा मानस असल्याने महाराष्ट्राला अग्रेसर करण्यात त्याचा निश्चितपणे फायदा होणार असल्याचे मत धवसे यांनी यावेळी व्यक्त केले.

संरक्षण, स्टील, टेक्स्टाइल, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात राज्यामध्ये चांगले काम सुरु आहे. त्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी पुरवठा साखळी समजावून घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे. सध्या कोणती लाट आहे, त्याचा अभ्यास करून काम केले तर या उदयॊजकांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

पूर्वी राज्यामध्ये उदयॊग हा मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे या भागापुरता मर्यादीत झाला होता. त्यामुळे काही प्रमाणात प्रादेशिक असमतोल निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर हा असमतोल दूर होत आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर या भागाचा चांगल्या प्रमाणात औद्योगिक विकास  होत आहे. आतापर्यंत गडचिरोलीचा परिसर हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जायचा, त्याचे रूप बदलत असून तिथे स्टिल इंडस्ट्रीचा विकास होत आहे.

समृद्धी महामार्गामुळे या भागातील उद्योगांना त्याचा चांगला फायदा होत आहे. उद्योगासाठी आवश्यक असणारी उत्तम प्रकारची इको सिस्टीम या माध्यमातून तयार होत आहे. राज्यामध्ये अनेक भागामध्ये क्लस्टर उभी राहत आहेत, त्याचा उद्योग वाढीसाठी चांगला फायदा होणार आहे. राज्याच्या अर्थचक्राला त्यामुळे गती मिळणार आहे. पुण्याजवळच्या सुप्यामध्ये सरकार खास जपानी कंपन्यांसाठी क्लस्टर उभे करत असल्याचे धवसे यावेळी म्हणाले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उदयॊगाना कर्ज देताना त्यांना आकारण्यात येणारे व्याज दर कमी करण्याची आवश्यकता आहे. या उद्योगांना पुढे नेण्यासाठी सरकारकडून त्यांना प्रोत्साहन दिले जाईल, त्यांना आवश्यक असणारी सर्व मदत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे धवसे यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या कल बदलतो आहे, त्यामुळे व्यवसायात असणाऱ्या प्रत्येकाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचीआवश्यकता असल्याचे ते यावेळी म्हणाले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उदयॊगांना अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागतो, त्यामुळे या उद्योगासाठी राज्य सरकारने स्वतंत्र मंत्रालय करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नचिकेत फडके यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading