बारामतीत अजित पवारांचा १० फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारणार
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज्यातील पहिला पूर्णाकृती पुतळा बारामतीत उभारला जाणार आहे. हा १० फूट उंचीचा ब्रॉंझ धातूचा पुतळा २२ जुलै रोजी, त्यांच्या जयंतीनिमित्त, नटराज कला दालन परिसरात स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती दालनाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.
पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून अनावरणासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पुतळ्याच्या अनावरणासोबतच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
दरम्यान, पुतळा उभारण्यासाठी आवश्यक परवानग्यांबाबत काही काळ चर्चा रंगली होती. सर्व विभागांची मंजुरी मिळाल्यानंतरही नगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळण्यास विलंब होत असल्याची चर्चा होती. या विलंबाच्या निषेधार्थ गुजर यांनी उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मध्यस्थीने आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उच्च दर्जाच्या ब्रॉंझ धातूपासून तयार करण्यात आलेला हा भव्य पुतळा बारामतीतील एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून, अजित पवार यांच्या सार्वजनिक योगदानाला अभिवादन करणारे स्मारक म्हणून ओळखला जाईल.
