Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भोंदूबाबा राधामोहन मिश्रा प्रकरणात धक्कादायक खुलासे; महिला अनुयायांचाही अत्याचारात सहभाग


पुणे : खराडी परिसरातील भोंदूबाबा राधामोहन मिश्रा प्रकरणाच्या तपासात अत्यंत गंभीर आणि संतापजनक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या पुरवणी जबाबात आश्रमातील महिला अनुयायीही तिच्यावर होणाऱ्या अत्याचारात सहभागी असल्याचा आरोप केला आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, उबाळेनगर येथील आश्रमात वास्तव्यास असताना कामात चूक झाली किंवा आदेशांचे पालन झाले नाही तर तिला विविध प्रकारच्या शिक्षा दिल्या जात होत्या. टेझर गनचे शॉक, मेणबत्तीचे चटके आणि मारहाण अशा अमानुष प्रकारांना तिला सामोरे जावे लागल्याचा दावा तिने केला आहे. काही वेळा तिला जबरदस्तीने मिश्राच्या खोलीत पाठवले जात असे आणि विरोध केल्यास महिला अनुयायीच तिचा आवाज दाबत असत, असेही तिने सांगितले.
तसेच, अत्याचाराच्या वेळी विरोध होऊ नये म्हणून तिचे हात-पाय बांधले जात, गुंगीची इंजेक्शने दिली जात आणि मानसिक छळही केला जात असल्याचे आरोप पीडितेने केले आहेत. या सर्व प्रकाराला आध्यात्मिक कल्याणाचा भाग असल्याचे सांगून तिची दिशाभूल करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणात खराडी पोलिसांनी राधामोहन मिश्रा, स्वामी कंवलनयन आणि सहा महिला अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यान, अटक झालेल्या सहा महिला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एफआयआर दाखल होण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करत त्यांनी हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या मुद्द्यावर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागवले असून आरोपींना नियमित जामिनासाठी खालच्या न्यायालयात अर्ज करण्याची मुभा दिली आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार असून न्यायालयाच्या भूमिकेकडे आणि तपासाच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading