मराठवाड्याच्या संघर्षमय इतिहासाचे एक स्वतंत्र ऐतिहासिक संग्रहालय व्हावे- डॉ. सुरज एंगडे
पुणे: १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाला, पण १७ सप्टेंबरला १९४८ ला मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. आपल्याला खूप मोठा संघर्ष करावा लागला. हा इतिहास आणि वारसा गौरवशाली असून त्याचे महत्व नव्या पिढीने समजून घेणे गरजेचे आहे. या मराठवाड्याच्या संघर्षमय इतिहासाचे एक स्वतंत्र ऐतिहासिक संग्रहालय व्हावे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय संशोधक आणि आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सूरज एंगडे यांनी केले.
मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने आयोजित मराठवाडा मुक्तिदिन मोहोत्सव आणि मराठवाडा भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विवेकानंद भोसले, पुणे अतिरिक्त क्राईम ब्रांचचे पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, समितीचे अध्यक्ष . राजकुमार धुरगुडे पाटील, सचिव दत्ताजी मेहेत्रे, किशोर पिंगळीकर,अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने देण्यात येणारे ‘मराठवाडा भूषण’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या मध्ये प्रशासकीय सेवेतील भरीव योगदानाबद्दल देविदास गोरे, कला साहित्यातील योगदानाबाद आसाराम लोमटे, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ.बबन जोगदंड, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘द प्राइड इंडिया’ ‘स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर’ आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल अनिरुद्ध चव्हाण यांना तर ‘विशेष मराठवाडा भूषण’ पुरस्कार अॅड. जी. आर. देशमुख यांना प्रदान करण्यात आला.